दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदीच्या विकासासाठी आळंदी देवस्थान, नगरपरिषद आणि ग्रामस्थांनी परस्पर समन्वय ठेवत एकत्र काम करणे अत्यावश्यक आहे. सर्व घटकांच्या सहकार्यातूनच शहराचा शाश्वत व नियोजित विकास साधता येईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.
आळंदीतील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, तसेच उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील तसेच आळंदीकर ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, “आळंदी ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. भाविकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, नागरी पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष दिले जाईल. आळंदी देवस्थान आणि नगरपरिषद यांच्यातील समन्वय अधिक बळकट करून विकासकामांना गती दिली जाईल. ग्रामस्थांचा विश्वास आणि सहभाग हाच विकासाचा खरा पाया ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आळंदीत जागतिक दर्जाचे ज्ञानपीठ उभारण्याचा देवस्थानचा संकल्प आहे. संतपरंपरेचे विचार, अध्यात्म आणि संस्कृती जगापर्यंत पोहोचविण्यासाठी हे ज्ञानपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मंदिर परिसराचे सुशोभिकरण, भाविकांसाठी सुसज्ज सुविधा आणि पवित्र वातावरण जपण्यासाठी नगरपरिषदेचे सक्रिय सहकार्य अत्यावश्यक आहे.



