Home Social ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमातून सुसंस्कृत पिढी घडणार :- अजित वडगांवकर…

‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमातून सुसंस्कृत पिढी घडणार :- अजित वडगांवकर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

चाकण – शालेय जीवनातच संत ज्ञानेश्वर महाराजांचे तत्वज्ञान, मूल्यशिक्षण आणि संस्कार रुजल्यास विद्यार्थी सुसंस्कृत, सद्गुणी व जबाबदार नागरिक घडतील. ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम मूल्यशिक्षण उपक्रमातून शालेय मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊन त्यांचे जीवनमान उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी केले.

          चाकण येथील कन्या शाळेत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या सामाजिक बांधिलकीतील उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज चरीत्र समिचे अध्यक्ष प्रकाश काळे होते. व्यासपीठावर ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील सदस्य, तुकाराम गवारी, वसंतराव कड, प्रा. श्रीधर घुंडरे, शंकर महाराज फफाळ महाराज, महादेव पाखरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

           संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांतर्गत शाळेस माऊलींची प्रतिमा अर्पण करण्यात आली. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना हरिपाठ, संतसाहित्ययुक्त सार्थ हरिपाठ, ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ अभ्यासक्रम पुस्तिका, सार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व पारायण प्रत देण्यात आल्या.

           या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार रुजवून अध्यात्मिक आवड निर्माण करणे व त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व सद्विचारांची पेरणी होऊन समाजासाठी उपयुक्त अशी नवी पिढी घडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.