ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- विक्ट्री फुटबॉल अकॅडमी, गुरुग्राम यांच्या वतीने साकोली येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोहम्मद आदिल व त्यांच्या टीमच्या पुढाकारातून क्रीडा संकुल, साकोली येथील मैदानावर पार पडली. या स्पर्धेत अंडर-१०, अंडर-१४, अंडर-१७ तसेच खुल्या गटातील संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयोजकांनी कोणत्याही संघाकडून प्रवेश शुल्क आकारले नाही.
स्पर्धेदरम्यान फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण होते. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले, तर विजेत्या संघांना मेडल, ट्रॉफी व शील्ड प्रदान करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, प्रा. डॉ.जितेंद्र कुमार ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डी.जी. रंगारी, बिट्टू गजभिये, प्रा.नीरज अतकारी, प्रा.डॉ. रामकुमार, प्रा.अशोक कुमार मीणा, प्रशिक्षक रोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार मैदानी खेळांमध्ये नक्कीच सहभाग घ्यावा. खेळ हे समाजाला एकत्र आणण्याचे सशक्त माध्यम आहे.
प्रा.डॉ.जितेंद्र कुमार ठाकुर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळात सहभाग घेतल्याने सर्वांगीण विकास होतो. फुटबॉल हा केवळ खेळ नसून तो निरोगी जीवनशैली, शिस्त आणि सामाजिक एकतेचे प्रभावी माध्यम आहे. युवकांनी फुटबॉलचा अवलंब करून आपले जीवन ऊर्जावान व शक्तिमान बनवावे तसेच फुटबॉलला करिअर व रोजगाराचा पर्याय म्हणूनही स्वीकारावे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पत्रकार डी.जी.रंगारी यांनी खेळामुळे निरोगी जीवनाची घडण होते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. विक्की गजभिये यांनी फुटबॉल खेळाची गरज व महत्त्व स्पष्ट करून अधिकाधिक लोकांनी क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद आदिल, जय प्रताप सिंह, शिवम, कन्हैया यादव, आयुष, मनीष पाठक आदींनी मोलाचे सहकार्य केले.



