Home Political नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाल… — चिमूरात पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अविनाश...

नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाल… — चिमूरात पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अविनाश अगडे यांचा राजीनामा…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे नेते अविनाश अगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

           अविनाश अगडे यांनी तालुका काँग्रेस कमिटी, चिमूरचे अध्यक्ष यांना उद्देशून दिलेल्या पत्रात नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर नैतिकतेच्या भूमिकेतून आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार पुढील काळातही संघटनात्मक कामकाजात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

           या राजीनाम्याची प्रत काँग्रेसच्या जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली असून, हा निर्णय केवळ औपचारिक नसून पक्षातील आत्मपरीक्षणाचे द्योतक मानले जात आहे.

           राजकीय जाणकारांच्या मते, हा राजीनामा काँग्रेसमधील जबाबदारीची भावना आणि संघटनात्मक सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत मताधिक्य घटले असले, तरी सत्ता न मिळाल्याने पक्षांतर्गत दबाव वाढला असून, त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

           नगरपरिषद निकालानंतर चिमूरच्या राजकारणात सुरू झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पुढील काळात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.