- शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मौजा शंकरपूर अंतर्गत चिमूर रोड वरील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी उपसरपंच अशोक चौधरी,श्री.विजय आनंदराव गळमडे,श्री.अनिल मधुकर समर्थ यांनी विज वितरण कंपनी कार्यालय शंकरपुरचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मौजा शंकरपूर येथील चिमूर रोडवर श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थानासमोर असलेल्या डी.पी.वरील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असून पूर्णतः बंद आहे.
सदर डी.पी. वर अवलंबून असलेल्या संपूर्ण परिसरातील नागरिकांना यामुळे गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोटारी कार्यान्वित होत नसून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.तसेच या डी.पी.वर आधारित वेल्डिंग मशीन, टायर दुरुस्ती केंद्रे,आटा चक्की व इतर लघु व्यावसायिकांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले असून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.ही बाव सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व तातडीची आहे.
सदर बाब यापूर्वीही वेळोवेळी आपल्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही आलेली नाही,त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.तरीही सार्वजनिक गैरसोय टाळण्यासाठी व कायदा-मुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या निवेदनाच्या दिनांकापासून तीन (३) दिवसांच्या आत सदर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून नियमित बीजपुरवठा सुरू करण्यात यावा,अशी नम्रपणे ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने पुढील प्रशासकीय स्तरावर तक्रार/आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल,याची नोंद घ्यावी. तरी वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांच्यासह दोन नागरिकांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता विद्युत वितरण विभाग चंद्रपूर,कार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग चिमूर यांना देण्यात आल्या आहेत.



