Home कृषी आंबा बागेत आंतरपीक म्हणून कोबी – फुलोरा लागवड, शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाचा लाभ…

आंबा बागेत आंतरपीक म्हणून कोबी – फुलोरा लागवड, शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाचा लाभ…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

        आंबा हे दीर्घकालीन फळपीक असल्याने लागवडी नंतर काही वर्षे उत्पन्न मिळत नाही. मात्र या कालावधीत आंबा बागेत आंतरपीक म्हणून कोबी व फुलोरा (फुलकोबी) पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून त्यातून खर्च कमी होऊन नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.

         आंबा बागेतील दोन ओळी मधील मोकळ्या जागेत कोबी व फुलोरा ही भाजीपाला पिके सहज घेता येतात. ही पिके कमी कालावधीत येणारी असून बाजारात त्यांना चांगली मागणी असते. विशेषतः हिवाळी हंगामात फुलोरा व कोबीला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

         आंतरपीक घेतल्यामुळे जमीन सतत लागवडीखाली राहते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच सेंद्रिय खतांचा योग्य वापर होतो. कोबी-फुलोरा पिकांसाठी दिलेले पाणी व खते आंबा झाडांनाही उपयुक्त ठरतात. परिणामी आंबा झाडांची वाढ जोमाने होत असून बागेची निगा राखणे सोपे जाते.

        स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य अंतर ठेवून आणि शिफारशीनुसार खत व पाणी व्यवस्थापन केल्यास आंतरपीकामुळे आंबा पिकावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट, पहिल्या ५–६ वर्षांत आंतरपीक घेतल्यास आंबा बागेवरील खर्च भरून निघण्यास मोठी मदत होते.

        प्रगतशील बागायतदार गोपाळ नरूटे व विलास नरूटे या दोन बंधू शेतकऱ्याने सांगितले की, “आंबा बागेत फुलोरा, व कोबी पिक घेतल्यामुळे एका हंगामातच चांगले उत्पन्न मिळाले. यामुळे पुढील हंगामातील बागेच्या कामांसाठी भांडवल उपलब्ध झाले.”

        एकंदरीत, आंबा बागेत कोबी व फुलोरा आंतरपीक म्हणून घेतल्यास शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत असून उत्पन्नवाढीसाठी हा प्रयोग निश्चितच उपयुक्त ठरत आहे. म्हणून आम्ही दुसऱ्यांदा आंबा बागेत कोबी पिकाची आम्ही लागवड केलेली आहे.