Home उपक्रम ‘गंध मातीचा, रंग संस्कृतीचा’ उपक्रमात श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील कलादालनाचा चतुर्थ वर्धापन दिन...

‘गंध मातीचा, रंग संस्कृतीचा’ उपक्रमात श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील कलादालनाचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील कै. दत्तात्रय मारुती आढाव कलादालनाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. १८) मोठ्या उत्साहात पार पडला. ‘गंध मातीचा, रंग संस्कृतीचा’ या त्रैवार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा संपन्न झाला.

         कलागुणांना योग्य दिशा, रंगसंगतीची ओळख आणि मुक्त अभिव्यक्तीची संधी देणारे हे कलादालन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. येथे साकारलेल्या विविध कलाकृती पाहून विद्यार्थी प्रोत्साहित होत असून, कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत आहेत.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. कृष्णा म.पाटील शास्त्री होते. प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मुनोत, ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार विजय दीक्षित, उद्योजक कांतीलाल मुनोत, राजेंद्रकुमार मुथा, रमणशेठ सिंघवी, संस्थाध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, उपमुख्याध्यापक किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक-पर्यवेक्षिका, कला शिक्षक तसेच शाळेची माजी विद्यार्थिनी व मराठी मालिकेतील अभिनेत्री काजल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

        संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्रास्ताविकात कलादालनाची संकल्पना मांडत, उद्योजक रमेश आढाव यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील दुर्मीळ असे नावीन्यपूर्ण कलादालन साकार झाल्याचे नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून एलिमेंटरी, इंटरमिजिएट व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यश वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

         ज्येष्ठ चित्रकार विजय दीक्षित यांनी कल्पकता आणि सातत्य या यशाच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असल्याचे सांगत, कलेत सातत्य ठेवल्यास जीवनात यश निश्चित मिळते, असा संदेश दिला. राजेंद्रकुमार मुनोत यांनी शाळेतील विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त करत ‘ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान’ असल्याचे मत मांडले.

       उद्योजक कांतीलाल मुनोत यांनी इच्छाशक्ती आणि गुरूंच्या मार्गदर्शनाच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते, असा प्रेरणादायी विचार मांडला. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील यांनी विद्यालयात व्यावहारिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचा समतोल साधला जात असल्याचे नमूद करत, संत ज्ञानेश्वर महाराज व संत जोग महाराजांच्या आशीर्वादाने संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

         यावेळी माजी ग्रंथपाल शिवाजी जाधव यांनी विद्यालयास ४३ इंची एलईडी टीव्ही भेट दिला. कार्यक्रमास आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पत्रकार श्रीकांत बोरावके यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी केले.