अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :– अमरावती शहरातील संताजी नगर येथील महिलेच्या खुनाचे क्लिष्ट प्रकरण गुन्हे शाखेने उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. निलीमा उर्फ पिंकी संजय खरबडे (नाकाडे) हिचा खून तिच्या दुसऱ्या पतीनेच केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे नाव नितीन सुरेश इंगोले (३२), रा. अशोक कॉलनी, अर्जुन नगर असे आहे. या प्रकरणामुळे परिसरात दहशत पसरली होती.

घरातच आढळला होता मृतदेह…
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, सायंकाळी सुमारे ५ वाजता, संताजी नगर येथील पिंकीच्या घरात तिचा मृतदेह आढळला. प्राथमिक पाहणीवरून अज्ञात कारणावरून तिचा खून झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवला गेला होता.
घटना गंभीर व क्लिष्ट होती कारण घटनास्थळावर कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
प्रेमसंबंधांचा पार्श्वभूमी…
माहितीप्रमाणे, निलीमा उर्फ पिंकीच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर ती संताजी नगरच्या गुरूकृपा कॉलोनीमध्ये एकटी राहत होती. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी अर्जुन नगरच्या अशोक कॉलनीत राहणारा नितीन इंगोले यांच्याशी तिचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर दोघांनी दोन ते तीन महिने अगोदर लग्न केले. विवाहानंतर पिंकीला तिच्या नवऱ्याच्या घरात राहण्याची इच्छा होती, परंतु नितीन इंगोले पूर्वीपासून विवाहित असल्याने तो आपल्या कुटुंबासोबत राहायचा. या मतभेदामुळे दोघांमध्ये सतत वाद सुरू होते, जे अखेर हत्येपर्यंत पोहोचले.

आरोपीची कबुली आणि गुन्ह्याचा तपशील…
चौकशीत आरोपीने कबुली दिली की, पिंकीच्या सततच्या आग्रहामुळे वाद निर्माण झाला होता. आरोपी विवाहित असून त्याने दुसऱ्या पत्नीला गुरूकृपा कॉलोनीतच राहण्यास सांगितले, पण पिंकीला ते मान्य नव्हते. दोघांमध्ये वाद चिघळत गेले आणि आरोपीने पिंकीची झोपेत असताना पाटा-वरवंटा मारून हत्या केली. याप्रकरणी आरोपीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही डीव्हीआर आणि मोबाईल सोबत नेले आणि भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
तांत्रिक तपास आणि साक्षीदारांची चौकशी…
गुन्हे शाखेने केअरटेकर अशोक खंडारे यांची चौकशी केली. त्याचबरोबर पिंकीशी शेवटचे कॉल, संपर्क, महिला मित्रांची चौकशी केली आणि आरोपीला ताब्यात घेऊन पूर्ण चौकशी केली. यामुळे आरोपीने सुरुवातीला टाळाटाळ केली, पण पोलिसांच्या चौकशीत अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कामगिरी…
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कमी वेळात तपास पूर्ण केला. या कामगिरीत पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त श्री शाम घूगे, श्री गणेश शिंदे, श्री रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शन होते. पथकातील सदस्यांमध्ये सपोनि इम्रान नायकवडे, अनिकेत कासार (सायबर), प्रियंका कोटावार (सायबर), पोउपनि गजानन सोनूने, पोलीस अंमलदार दिपक सुंदरकर, सचिन बहाळे, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संभे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, योगेश पवार, राजीक रायलीवाले, नरेश मोहरील, प्रभात पोकळे, संदिप खंडारे, राहूल दुधे, सुषमा आठवले (सायबर) यांचा समावेश होता.

