रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता सर्वत्र निकालाची उत्सुकता वाढली आहे. मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत गटावर राज्य निवडणूक आयोगाचे मतमोजणीसंबंधी पत्र प्रसिद्ध केले. त्यानुसार मतमोजणी रविवारी, दि. 21 डिसेंबर रोजी होणार असून अजून 18 दिवसांचा अवधी असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक अधिक वाढली आहे.
दरम्यान, आज (03 डिसेंबर) रोजी निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे EVM सुरक्षेचा त्यासाठी सर्व पक्ष व अपक्ष उमेदवारांनी संयुक्तरित्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही मागण्या केल्या.
निवेदनात EVM ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या 100 मीटर परिसरात जॅमर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पक्ष व अपक्ष उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना 100 मीटर मर्यादेत तंबू उभारून मुक्कामी राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
उमेदवारांनी EVM ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. निवेदन देताना सारिकाताई नंदेश्वर (काँग्रेस) – नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, गीता लिंगायत (भाजपा) – नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, तसेच प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील सर्व अधिकृत पक्षाचे उमेदवार व अपक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आली आहे.



