Home Political भाविकांसाठी व आळंदीकरासाठी सुविधा आणि विकास हीच आमची बांधिलकी :- मुख्यमंत्री देवेंद्र...

भाविकांसाठी व आळंदीकरासाठी सुविधा आणि विकास हीच आमची बांधिलकी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – “आळंदीकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकास हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. आळंदी ही आध्यात्मिक भूमी असून ती आधुनिकतेच्या दिशेने वेगाने पुढे जावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते. शहरातील विविध विकास योजनांचा आढावा घेत फडणवीस म्हणाले की, “आळंदीकरांच्या रोजच्या गरजा, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सुविधा यांचा सर्वांगीण विचार करून पुढील पाच वर्षांसाठी ठोस आराखडा तयार केला आहे. हे काम फक्त जाहीरातीत नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून पूर्ण करण्याची आमची तयारी आहे.”

            मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित नागरिकांत ऊर्जा आणि आशावादाची भावना दिसून आली. त्यांनी सांगितले की, “आळंदीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि नागरिकांसाठी सुसंगत शहर रचना ही काळाची गरज आहे.

        प्रचारसभेसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्षाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         आळंदीचा विकास वेगवान आणि नियोजनबद्ध करण्यासाठी येणारी निवडणूक महत्त्वाची असल्याचा संदेश फडणवीसांनी यावेळी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, राजेंद्र गिलबिले, तुषार घुंडरे यांच्या सहीत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.