अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन उड्डाणपूल गेल्या चार महिन्यांपासून बंद पडल्यानंतर नवनवे उपाय सूचविले जात आहे. आता हे रेल्वे स्थानक आहे, त्या ठिकाणावरून राजापेठकडे हलविण्याचा प्रस्ताव समोर आला असून तो मान्य झाला तर उड्डाणपूल बनविण्याची गरज राहणार नाही.
त्याच पैशात नवे स्थानक विकसीत होईल आणि आहे त्या स्थानकावर संग्रहालय,ग्रंथालय या सारख्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण होतील आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा, प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या अभियंता वेदांश खंडेलवाल यांनी केला आहे.
खासदार अनिल बोंडे व भाजपा सरचिटणीस नितीन गुडधे यांच्या उपस्थितीत वेदांश याने आपल्या प्रकल्प अहवालाची माहिती शनिवारी पत्रकारांना दिली. तत्पूर्वी खा.अनिल बोंडे यांनी सदर प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सदर प्रस्ताव आवडला असून त्यांनी तत्त्वतः मान्यता देत पूर्ण सहकार्याची हमी दिली आहे. प्रकल्प पूर्णत्वास देण्यात काही अडचणी निश्चित असून त्या दूर करण्यासारख्या आहेत, असे खा.बोंडे यांनी सांगितले.
वेदांश याने पुढे सांगितले की, रेल्वे स्थानक हलविल्यास उड्डाणपूल बांधण्याची गरजच राहत नाही. नागरिकांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. सध्याचा जो रेल्वे स्टेशन चौक आहे, तेथे विविध भागातून येणारे आठ रस्ते एकत्र येतील. त्यातील एक रस्ता नव्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे जाईल. नवे रेल्वे स्थानक राजापेठ पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या जागेत होईल.
सध्या तेथे मनपाचा जप्त साहित्य जमा करण्याचा डेपो आहे. बेलपुरा येथील अतिक्रमण आणि राजापेठ पोलिस ठाणे, मनपा झोन कार्यालय व अन्य खाजगी इमारतींना धक्का न लावता सहजतेने हे करता येईल. दोन रस्तेपण होतील इतकी पुरेशी जागा तेथे उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे हा प्रस्ताव स्विकारल्यास विद्यमान रेल्वे स्थानक व नेहरू मैदान अशी एकूण ९ हजार वर्ग फुट जागा मोकळी होऊन उपयोगात येईल. या जागेत अत्याधुनिक बिझनेस पार्क, मल्टीलेव्हल पार्किंग हब, संग्रहालय, ग्रंथालय, पर्यटन उद्यान, सांस्कृतीक केंद्र, क्रिडा संकूल विकसीत केले जाईल.
सार्वजनीक व खाजगी भागीदारी तत्त्वावर हे उभारणे शक्य आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आला तर शहराचे पूर्व व पश्चिम विभाजन दूर होऊन एकसंघपणा दिसेल. रोजगाराच्या संधी वाढतील. सर्वात महत्त्वाचे वाहतूक समस्या कायमची निकाली निघणार असल्याचे वेदांश याने सांगितले.



