बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक (ता.इंदापुर) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. सप्ताह स्थळी मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे.
गावातील विविध भजनी मंडळे, वारकरी तसेच विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष गावचे पोलीस पाटील, तरुण कार्यकर्ते व युवक मंडळांच्या पुढाकाराने सप्ताह कार्यक्रमांची संपूर्ण आठ दिवस अन्नदान सेवा देण्याची आखणी, व नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 28 /11 /2025 रोजी सप्ताहाला प्रारंभ होणार असुन. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु बापूसाहेब मधुसूदन देहूकर महाराज मळवली माजी अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील सर्वच भक्त जणांच्या व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
श्री गुरु बापूसाहेब देहुकर व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तुकाराम महाराज गाथा पूजन, विठ्ठल रुक्मिणी माता पूजन,विनापूजन, झेंडा पूजन करून व अनेक भाविक भक्त व वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सुरुवात होणार आहे,
ग्रामस्थांच्या सहयोगातून सप्ताहाच्या स्थळाची स्वच्छता, इलेक्ट्रिक सजावट आणि दर्जेदार मोठा मंडप उभारणीचे कामे वेगाने केली जात आहेत. संतांचे कीर्तन, भजन, नामसंकीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. महिला मंडळाच्या वतीने दैनंदिन आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे.
गावभर प्रसन्न वातावरण निर्माण झाले असून सर्व वयोगटातील नागरिक या धार्मिक सोहळ्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. येत्या शुक्रवार दिनांक 28/ 11/ 2025 ते शुक्रवार दिनांक 5 /12/ 2025 या दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाचे उद्घाटन होणार असून मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.
पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ, स्थानिक वारकरी मंडळी आणि विणेकरी टाळकरी मृदंग वादक तबलावादक, सह सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने हा सप्ताह अधिक भव्यदिव्य करण्याचा निर्धार पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे.



