दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा युवा व गतिमान नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संदीप नाईकरे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी केली आहे.
शहरातील विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि संघटन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने नाईकरे-पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात समन्वय राखून नव्या जोमाने संघटन मजबूत करण्याचे आव्हान आता त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना संदीप नाईकरे-पाटील म्हणाले, “आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवणार. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटनवृद्धी, जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहे.” त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसच्या प्रचारयोजनांना दिशा मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.



