दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत रंगणार असून, उमेदवारांच्या घोषणेनंतर प्रभागातील वातावरण तापले आहे. घुंडरे घराण्यातील सदस्यच चार उमेदवारांच्या रूपाने एकमेकांसमोर उभे ठाकल्याने प्रभागात वेगळीच राजकीय कुजबुज सुरू झाली आहे. शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे व ऋतुजा घुंडरे हे पती पत्नी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.
प्रभाग क्र. १-ब मधून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे हे शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. या दोघांतील लढत प्रतिष्ठेची मानली जात असून, दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान, प्रभाग क्र. १-अ मधील लढतही तितकीच लक्षवेधी ठरणारी आहे. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग कुऱ्हाडे यांची कन्या आणि माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांची पत्नी ऋतुजा घुंडरे या शिवसेनेकडून उमेदवारीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे यांची सुन ज्योती घुंडरे या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आहेत.
स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, तसेच महिलांसाठी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा यांवर दोन्ही पक्षांकडून लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रभागात तरुण मतदारांचा प्रभाव मोठा असल्याने मतांची सरमिसळ आणि घराण्यातील वैचारिक फूट यामुळे लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे.
मात्र, अंतिम निर्णय मतदारच देणार. येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढत असताना प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना आणि घुंडरे विरुद्ध घुंडरे अशी दुहेरी लढत असल्याने संपूर्ण आळंदीचे लक्ष या प्रभागावर केंद्रित झाले आहे.



