Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी चौघांची उमेदवारी कायम… — भाजपचे...

आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी चौघांची उमेदवारी कायम… — भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे प्रकाश कुऱ्हाडे – थेट लढत

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात उरले असून लढतीचा केंद्रबिंदू मात्र दोन प्रमुख उमेदवारांकडेच वळला आहे. भाजपचे प्रशांत पोपट कुऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांच्या थेट मुकाबल्यामुळे निवडणुकीची हवा अधिकच तापू लागली आहे.

       नामांकन अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर माघारीच्या अंतिम मुदतीत मैदानातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी चार उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. मात्र या चौघांमध्ये कुऱ्हाडे विरुद्ध कुऱ्हाडे असा ‘भावकीतील महादंगल’ आकार घेत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. स्थानिक राजकारणात एकाच आडनावाचे प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्यानं मतदारांच्या चर्चेतही या लढतीला विशेष स्थान मिळाले आहे.

        भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदीच्या विकासाचा रोडमॅप जाहीर करत जलपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि स्मार्ट शहर संकल्पना यांवर आधारित प्रचार सुरु केला आहे. कार्यकर्त्यांचे मेळावे, घराघर संपर्क आणि सोशल मीडियावरून प्रबळ प्रचार मोहिमेद्वारे त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची गती वाढवली आहे.

       याउलट, राष्ट्रवादीचे प्रकाश कुऱ्हाडे यांनी नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागनिहाय संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रशासनातील अपुऱ्या व्यवस्थांवर टीका करत पर्यायी विकास मॉडेल मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीचा उमेदवारही प्रचारात समान ताकदीने उभा राहिला आहे.

        मैदानात असलेले उर्वरित दोन उमेदवारही जनसंपर्क करत असले तरी शहरातील मुख्य लढत या दोन पक्षांमध्येच केंद्रित झाली आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येणार असून शक्तिप्रदर्शनाच्या आणि रणनितीच्या हालचाली राजकीय वातावरण तापवत आहेत. आळंदीतील नगराध्यक्षपदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने दोन्ही पक्षांनी आपापले राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे. मतदारांची अंतिम पसंती कुणाकडे झुकते, हे पाहण्यासाठी राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.