शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकातंर्गत मौजा शंकरपूरसह सर्व गावांमध्ये राहणाऱ्या निराधार,अपंग,विधवा व वृद्ध लाभार्थ्यांचे अनुदान/पेन्शन मागील अनेक महिन्यांपासून थांबविलेले आहे.
या अत्यंत दुर्बल घटकांच्या जगण्याचा एकमेव आधार असलेले शासकीय अनुदान थकवून ठेवणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जगणे संकटात आले आहे.
त्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.वृद्धांना औषधोपचारासाठी पैसे नाहीत,अपंग व्यक्तींना दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत,विधवा महिलांना मुलांचे संगोपन कठीण झाले आहे,निराधार कुटुंबांकडे रोजच्या खर्चासाठीही साधन नाहीत.
हे संबंधित प्रशासनातील दप्तर दिरंगाईचा प्रकार असून, त्यांच्याकडून निधी देण्यास होणारा अडथळा अन्याय करणारा आहे.हा सगळा संबंधित विभागाचा अनागोंदी कारभार असल्याने त्यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.यामुळेच निराधाराचे मानधन वेळेवर न देण्यास संबंधित विभाग जबाबदार असल्याचे मत उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांचे आहे.
त्यांच्या खालील प्रमाणे मागण्या….
१) चिमूर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांचे थकलेले अनुदान तात्काळ मंजूर करून खात्यात जमा करण्यात यावे.
२) अनुदान का म्हणून थकले याबाबत संबंधित विभागांकडून लेखी अहवाल मागवावा.
३) पुढील काळात चिमूर तालुक्यात कोणत्याही लाभार्थ्यांचे अनुदान रोखून ठेवले जाणार नाही यासाठी कडक आदेश जारी करावेत.
४) जर तत्काळ कार्यवाही झाली नाही तर लाभार्थ्यांसह ग्रामपंचायतस्तरावरून पुढील गंभीर पाऊल उचलावे लागेल,याची नोंद घ्यावी.
जनहिताला बाधा पोहोचवणाऱ्या विलंबाची जबाबदारी प्रशासनावर आहे.त्यामुळे या निवेदनावर आजच तात्काळ कार्यवाही करावी,अशी अपेक्षा निवेदनकर्ता उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.



