दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – प्रभाग क्रमांक ५अ मध्ये भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताच तरुणाईत उत्सुकता वाढवणारे नाव म्हणजे खुशी सागर बोरुंदिया. विकासासाठीची स्पष्ट दृष्टी, प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाय मांडण्याची पद्धत आणि महिलांच्या नेतृत्वाला चालना देण्याचा निर्धार यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. या पार्श्वभूमीवर खुशी बोरुंदिया यांनी ‘दखल न्यूज’ शी संवाद साधला.
प्रश्न १ : प्रभाग क्रमांक ५ साठी उमेदवारी का?
खुशी बोरुंदिया :-
“माझा जन्म – वाढ या भागातच झाली आहे. इथल्या समस्या, अपेक्षा, आणि विकासातील अडथळे मला जवळून माहित आहेत. प्रभाग ५ चा सर्वांगीण विकास आणि नव्या पिढीसाठी सुरक्षित, सुविधा-संपन्न परिसर उभारणं हे माझं स्वप्न आहे. भाजपने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कामातून सिद्ध करणार आहे.
यासोबतच, माझ्या घरातील समाजसेवेची परंपरा हा माझा मोठा आधार आहे. माझे आजोबा माजी नगरसेवक स्व. संपतशेठ बोरुंदिया आणि माझे वडील माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे ही माझ्यासाठी प्रेरणा आणि आशीर्वाद आहेत. त्यांच्या पाऊलखुणांवर चालत प्रभागासाठी निष्ठेने काम करण्याचा निर्धार मी केला आहे.”
प्रश्न २ : प्रभागाचा मुख्य ‘विकास रोडमॅप’ कोणता?
उत्तर…
“विकासासाठी चार प्रमुख मुद्द्यांवर मी काम करणार…
1️⃣ मूलभूत सुविधा उभारणी – पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईनचे आधुनिकीकरण.
2️⃣ सुरक्षित प्रभाग – सीसीटीव्ही नेटवर्क, गल्लीनिहाय एलईडी लाईट्स.
3️⃣ महिला व युवकांसाठी उपक्रम – कौशल्यविकास केंद्र, क्रीडा सुविधा, आरोग्य तपासणी शिबिरे.
4️⃣ हरित प्रभाग – वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक–मुक्त मोहिमा.
प्रभाग ५ चा चेहरामोहरा पुढील १ वर्षांत बदलणार हे माझं वचन आहे.”
प्रश्न ३ : युवा नेतृत्व म्हणून नागरिकांच्या कोणत्या अपेक्षा जाणवल्या?
उत्तर…
“तरुणांमध्ये राजकारणातील पारदर्शकता, गतिमान कामकाज आणि प्रत्यक्षात दिसणारा विकास याची तीव्र मागणी आहे. त्यांना फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. महिलांमध्येही सुरक्षितता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. मी या दोन्ही वर्गांचे प्रतिनिधित्व करत आहे.”
प्रश्न ४ : विरोधकांपेक्षा तुमचा ‘फायदा’ काय?
उत्तर…
“भाजपची विकासाची परंपरा, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, माझी तरुणाईची ऊर्जा आणि प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं — हे माझं मोठं बलस्थान आहे.
त्यासोबतच, माझ्या आजोबा व वडिलांनी केलेल्या प्रभागातील प्रत्यक्ष विकासकामांची वारसा-संपदा मला लाभली आहे. त्यांनी लोकांशी जपलेला संवाद, विश्वास आणि कार्यशैली मला मार्गदर्शक ठरते.”
प्रश्न ५ : महिलांच्या नेतृत्वाबद्दल तुमची भूमिका?
उत्तर…
“महिला केवळ मतदानापुरत्याच मर्यादित राहू नयेत; त्यांना निर्णय प्रक्रियेत अग्रस्थानी आणणं गरजेचं आहे. महिला सुरक्षा, आरोग्य, स्वावलंबन आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये मी विशेष काम करणार आहे. ‘महिला सशक्त झाल्या तर प्रभाग सशक्त होतो’ हा माझा विश्वास आहे.”
प्रश्न ६ : आळंदीतील वारकरी व भाविकांच्या सुविधांबाबत तुमचा काय दृष्टिकोन आहे?
खुशी बोरुंदिया…
“आळंदी म्हणजे संत परंपरेची भूमी. येथे दररोज हजारो भाविक येतात आणि कार्तिकी-आषाढी वारीच्या वेळी तर लाखोंचा मेळा असतो. वारकरी आणि भाविक हे आळंदीची ‘ओळख’ आहेत. त्यामुळे त्यांच्या सुविधा हे माझ्या कामाचं सर्वात महत्त्वाचं प्राधान्य असेल.
भाविकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या…
• पार्किंगची अडचण
• स्वच्छता व आरोग्य
• वाहतूक कोंडी
• पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
• रात्रभर प्रकाशयोजनेचा अभाव
• वारी काळात वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन केंद्रांची अपुरी उपलब्धता
या सर्व समस्यांवर ठोस उपाय योजना करणार आहे.
आळंदीला येणारा प्रत्येक भाविक हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यांच्या सोयी–सुविधांमध्ये सुधारणा करणे हा माझा ‘धर्म’ आणि कर्तव्य आहे. वारकरी परंपरेचा सन्मान राखत प्रभाग आणि शहर विकासाला हातभार लावणे हे माझे ध्येय आहे.”
प्रश्न ७ : नागरिकांना तुमचे थेट संदेश?
उत्तर…
“प्रभाग ५ चा सर्वांगीण विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधा या चार स्तंभांवर उभं राहणार आहे. तुमचा एक एकमत माझी ताकद वाढवेल आणि प्रभागाच्या बदलाची नवी सुरुवात होईल.
मी तुमच्यापैकीच एक आहे… तुमच्यासाठी, तुमच्या विकासासाठी काम करण्यास सदैव तयार आहे. माझ्या कुटुंबाने प्रभागासाठी केलेल्या कामांची पायाभरणी माझ्यासमोर आहे, त्यावर आणखी आधुनिक, सुविधा-संपन्न आणि सुरक्षित प्रभाग उभा करण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे.”



