Home Maharashtra लक्ष्मी नरसिंह तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांपैकी अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे… ...

लक्ष्मी नरसिंह तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांपैकी अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे… — लक्ष्मी नरसिंह आराखड्यातील संपूर्ण कामाची चौकशी व्हावी…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्यामुळे या देवस्थानासाठी 260 कोटी रुपये निधीची कामे केलेली असून उर्वरित काही कामे राहिलेले आहेत त्यापैकी ड्रेनेजचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे हे निदर्शनात आलेले आसुन चेंबर मधून दुर्गंधी पाण्याचा प्रवाह निघत आहे. या दुर्गंधी पाण्या पासून अनेक रोगरायला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे, थंडीचा कडाका त्यात दुर्गंधी पाण्यापासून गावात अनेक रोगराई पसरू लागलेले आहेत.

       अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारीनंतर ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेनेज लाईनचे पाईप बसवताना तांत्रिक निकष पाळले गेले नाहीत, काही ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही भागातील चौकात दुर्गंधी पाणी व मलनिस्सारणाचा प्रवाह वाहत असताना ग्रामस्थांना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रस्त्यांवर पाणी साचणे, यामुळे भाविकांना व नागरिकांना दुष्परिणाम भोगावे लागत आहे. पूर्ण गावामध्ये अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत.

       संबंधित कामांचे स्वीकृतीपत्र कसे दिले गेले, कामांच्या गुणवत्तेची तपासणी का झाली नाही, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून संपूर्ण कामे पुन्हा दुरुस्त करण्यात यावी अशी या भागातील भाविकांची व ग्रामस्थांची मागणी आहे . तीर्थक्षेत्राचा विकास हा दीर्घकालीन आणि दर्जेदार असावा, अशी नागरिकांची मागणी असून या प्रकरणामुळे आराखड्यातील इतर सर्व कामांच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.

चौकट…

      राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे याकडे लक्ष देऊन उर्वरित सर्व कामे पूर्ण करून घेतील अशी भाविकांची व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

चौकट…

      विद्यमान सरपंच नितीन सरवदे व उपसरपंच गुरुदत्त गोसावी आणि ग्रामपंचायत सदस्या सहित सर्व ग्रामस्थ यांनी याबद्दल वेळोवळी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.