दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना (शिंदे गट) कडून जोरदार तयारी सुरू झाली असून पक्षाने खासदार श्रीरंग बारणे यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. बारणे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या निवडणूक मोहिमेला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आळंदी शहरातील संघटन मजबूत करणे, प्रभागनिहाय रणनीती आखणे, उमेदवार निवड प्रक्रियेला गती देणे आणि कार्यकर्त्यांचे समन्वयन या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बारणे यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.
आळंदीतील प्रमुख पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि वाहतूक कोंडी अशा मूलभूत मुद्द्यांवर केंद्रित करत पक्षाने नागरिकांशी थेट संवाद वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी बारणे लवकरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून निवडणूक आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. बारणे यांच्या नियुक्तीनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत पक्ष मजबूत कामगिरी करेल, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.



