रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रवेशामुळे चिमूरसह राज्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. जुनेद खान यांनी रविवारी आपला राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानंतर गुरुवारी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.
गेल्या दहा वर्षांपासून भाजपा संघटनेत सक्रिय असलेल्या खान यांनी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री, भाजपा कार्यकारिणी सदस्य तसेच नागपूर महानगरपालिकेच्या कोअर कमिटीचे कायम निमंत्रित सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली होती. परंतु, पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या मते, दहा वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य केले, मात्र कदर झाली नाही.चिमूर गृहक्षेत्रात पार्टी विषयी कोणत्याही प्रकारची विचारपूसही होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना खान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वीही जुनेद खान यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदांवर काम पाहिले होते. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश म्हणजे एकप्रकारे ‘घरवापसी’ असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. खान यांच्या आगमनाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला उभारी मिळेल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.
सोबतच चिमूरचे व्यापारी संतोष गोहणे व सतिश वनकर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला यावेळी माजी विधी मंडळ विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ.सतीश वारजूकर,व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते



