रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दारुचा अवैध व्यवसाय करणे तारेवरची कसरत असते.यामुळे पोलिस विभागाला सांभाळून घेतल्याशिवाय हा व्यवसाय सुरळीत व दिमाखात चालू ठेवता येत नाही हे वास्तव आहे.
परंतु काही ठिकाणचे पोलिस प्रशासन अवैध दारू व्यवसायाला चालना देत नाही तर काही ठिकाणचे पोलिस प्रशासन अवैध दारू व्यवसायाला चालना देतात…
चिमूर तालुक्यात जिकडे तिकडे अवैध दारु व्यवसायाचा बोलबाला आहे.हा व्यवसाय पोलिसांच्या नजरेआड सुरू राहते हे खरे असले तरी पोलिसांच्या नजरेत व डोक्यात राहते हे सुद्धा तितकेच खरे आहे.
पहिले अवैध व्यवसाय करणेवाल्या इसमांसोबत पोलिस दिसत नव्हते.जंगल भागात किंवा विरान जागी अवैध व्यवसायिक आणि पोलिसांच्या बैठका व्हायच्या.
मात्र आता तसे राहिले नाही,अवैध व्यवसायाबद्दल आता बिनधास्त दाराआड किंवा खुल्या ठिकाणी बैठका होतात किंवा चर्चा होतात आणि रेट ठरवले जातात असे अवैध दारू,सट्टा,जुगार व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
बैठकीतील चर्चे दरम्यान एकदाचा देवाणघेवाणचा अंतीम तोडका निघाला की,दारु पुरवठा करणारा अवैधपणे देशी-विदेशी-गावठी दारुचा पुरवठा करतो व दारु विकणेवाले दारु विकतात…
बैठक झाली,तोडगा निघाला,मग भिती कशाची? आडमार्गाने दारु पुरवठा बिनधास्त केला जातो आणि दारु सुध्दा जागोजागी,रस्तोरस्ती खुल्लम खुल्ला विकली जाते.
सट्टा व जुगार सुध्दा तसाच! खुल्लम खुल्ला रस्त्यावर,रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत!..
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जांभूळघाट बिटात देशी-विदेशी दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने केला जातो आहे.हा पुरवठा कोण करतोय आणि सदर दारु पुरवठा करणाऱ्या टोळ्यांकडे भिसी पोलिसांचे दुर्लक्ष का म्हणून आहे? हेच प्रामुख्याने भिजते घोंघडे आहे..
जांभुळघाट बिटातील अनेक गावात,अनेक ठिकाणी देशी विदेशी दारुचा पुरवठा मागील चार वर्षांपासून एकच व्यक्ती आपल्या विश्वासू सहकाऱ्यांद्वारे करीत असल्याचे समोर आले आहे.
मागील चार वर्षापासून अवैध व्यवसायाला अनुसरून जांभुळघाट बिटात मोठ्या प्रमाणात होणारी दारुची तस्करी आता संघटीत गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणून पुढे येतो आहे.आजच्या स्थितीत जांभूळघाट बिट हे दारुमय झाले असल्याचे दिसून येते आहे.
मात्र जांभुळघाट बिटात अवैध दारूचा पुरवठा करणारा मोहरक्या,त्याचे साथीदार,दारुची अवैध विक्री करणारे अनेक इसम भिसी पोलिसांना का म्हणून सापडत नाही हे एक अनुत्तरित कोडे आहे..
अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुचा पुरवठा करणाऱ्या मुख्य व्यक्तीला,त्याच्या साथीदारांना व दारुची विक्री करणेवाल्या इसमांना भिसी पोलिस पकडणार काय आणि संघटीत गुन्हेगारी अन्वये त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करणार काय?हा प्रश्न फारच आव्हानात्मक!



