युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर पारस परिसरात आज ( दि. 10) रोजी सकाळच्या सुमारास दर्यापूर येथिल 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह हिंगणी मिर्झापूर धरणातील पाण्यात तरंगतांना आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
स्थानिक नागरिकांना धरणातील पाण्यात एका तरंगत्या मृतदेहाचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ ही माहीती दर्यापूर पोलिस स्टेशनला कळविली.
माहीती मिळताच दर्यापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा विक्की नामदेवराव ढेरे (वय 29 ) रा. प्रबोधन शाळेजवळ, मूर्तिजापूर रोड, दर्यापूर यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर येथे पाठविला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळावर सखोल तपास सुरू केला आहे.
स्थानिकांमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली असून, विक्की ढेरे यांच्या मृत्यूमागिल कारण शोधण्यासाठी दर्यापूर पोलिस विविध मार्गाने तपास करीत आहेत. आत्महत्या की अपघात याबाबतची खात्री तपासानंतरच होऊ शकेल.



