Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : भाजपच्या तिकीटासाठी सर्वपक्षीय नेत्यांची लगबग… — निष्ठावंत...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : भाजपच्या तिकीटासाठी सर्वपक्षीय नेत्यांची लगबग… — निष्ठावंत इच्छुक कार्यकर्त्यांची वाढली धाकधूक!..

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून, भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदासह विविध प्रभागांमध्ये तिकीट मिळविण्यासाठी अनेक दिग्गज नेते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पक्षात प्रवेश करून प्रयत्नशील असल्याचे चित्र सध्या आळंदीत दिसत आहे.

         भाजप हा सत्तेचा प्रमुख पक्ष असल्याने आळंदीतही तिकिटासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मधील काही प्रभावी नेत्यांचा व कार्यकर्तेही भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि धाकधूक वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात आता “तिकीट बाहेरच्या नेत्याला मिळणार का?” अशी शंका निर्माण झाली आहे.

         भाजपच्या निवडणूक समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज पोहोचले असून, प्रत्येक प्रभागात तिकीटासाठी किमान पाच ते सात जण इच्छूक आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत मतभेदही डोकावत आहेत. तरीही पक्षातील वरिष्ठ नेते “सर्वांना न्याय देऊ” असा विश्वास देत आहेत.

          आळंदी शहरात भाजपने गेल्या काही वर्षांत विविध विकासकामे केली असून, त्याच बळावर पुन्हा सत्ता मिळविण्याचा पक्षाचा निर्धार आहे. मात्र, उमेदवार निश्चित करताना निष्ठावंत कार्यकर्ते आणि नवागत नेते यांच्यातील समतोल साधणे हे पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

          दरम्यान, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या गटांतील बैठकांमध्ये आणि समन्वयकांच्या चर्चेत प्रभागनिहाय समीकरणे तपासली जात आहेत. नगराध्यक्षपदासाठीही काही दिग्गज नेत्यांची रस्सीखेच सुरू असून, पुढील काही दिवसांत आळंदीचे राजकारण आणखी रंगणार हे निश्चित दिसते.