Home Political सर्वांच्या मदतीला धावणारा निसारभाई सय्यद प्रभाग २ च्या रणांगणात… — राष्ट्रवादी...

सर्वांच्या मदतीला धावणारा निसारभाई सय्यद प्रभाग २ च्या रणांगणात… — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारीची अपेक्षा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मदतीला तत्पर असलेले समाजसेवक निसारभाई सय्यद हे आता रणांगणात उतरले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळण्याची त्यांची प्रबळ अपेक्षा आहे.

        निसारभाई सय्यद हे गेल्या अनेक वर्षांपासून आळंदी शहरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्यरत आहेत. नागरिकांच्या समस्या, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, तसेच शिक्षण या क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार अनेकदा प्रशासनाला पावले उचलण्यास भाग पाडणारे ठरले आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा, समाजातील प्रत्येक घटकाला आपला मानणारा असा त्यांचा स्वभाव असल्याने प्रभागात त्यांची लोकप्रियता लक्षणीय आहे.

        प्रभाग क्रमांक २ मधील अनेक नागरिक त्यांच्या संपर्कात असून, निसारभाईंच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निष्ठा दिसते, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, युवक वर्ग व अल्पभूधारक कुटुंबांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.

         आळंदीच्या विकासासाठी स्वच्छता, आधुनिक रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवा या मूलभूत सुविधा बळकट करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे निसारभाईंनी सांगितले. “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समाजघटकांचा सहभाग असलेल्या आळंदीचे स्वप्न साकार करण्यासाठी मी तयार आहे,” असे ते म्हणाले.

           दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारीसाठी अनेक जणांची चर्चा असली तरी निसारभाई सय्यद यांचे जनसंपर्क आणि समाजकार्यातील सक्रियता पाहता त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला तर प्रभाग क्रमांक २ मध्ये रंगतदार लढत होणार, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.