दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आळंदी शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधून तृप्ती महेश कुऱ्हाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. प्रभागातील महिला सबलीकरण, स्वच्छ आणि सुसंस्कृत आळंदी हा त्यांचा मुख्य ध्येयविचार असून, “जनतेच्या विश्वासाने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
तृप्ती महेश कुऱ्हाडे या गेल्या अनेक वर्षांपासून महिला बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी विविध प्रशिक्षण शिबिरे, लघुउद्योग कार्यशाळा आणि स्वयंरोजगार उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांनी शिवणकाम, मसाले उत्पादन, हातकला वस्तू तयार करणे, तसेच घरगुती व्यवसाय सुरू करून स्वतःचे आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे.
त्यांचे पती महेश कुऱ्हाडे हे आळंदी शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते असून, विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी अनेक वेळा सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याचा फायदा तृप्ती कुऱ्हाडे यांच्या प्रचार मोहिमेला निश्चितच होणार आहे, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
तृप्ती कुऱ्हाडे म्हणाल्या, महिलांच्या अडचणी, पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करणे हे माझे प्राधान्य आहे. आळंदीच्या संतभूमीला शोभेल असा स्वच्छ, सुंदर आणि सुबक प्रभाग घडविण्याचे माझे स्वप्न आहे.”
प्रभाग क्रमांक सहा मध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने या भागातील निवडणुकीची लढत विशेषतः लक्षवेधी ठरणार आहे. सामाजिक कार्याच्या बळावर आणि प्रामाणिक काम करण्याच्या प्रतिमेमुळे तृप्ती कुऱ्हाडे यांचे नाव नागरिकांमध्ये चर्चेत आले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग सहामध्ये नव्या प्रकारची चुरस निर्माण होणार असून, महिला नेतृत्वाचा प्रभावी आवाज नगरपरिषदेत पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत.
सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या या उमेदवाराकडून नागरिकांना विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



