अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत..
चिखलदरा :- विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदराच्या स्काय वॉक प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत अडकले आहे.
महाराष्ट्राचे पर्यटन मानचित्र बदलवणारा हा भव्य प्रकल्प आता कासवगतीने रेंगाळत असून,पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
2019 साली चिखलदरा स्काय वॉक प्रकल्पाची धडाकेबाज सुरुवात झाली होती.निसर्गरम्य दरीवरून पर्यटकांना अविस्मरणीय दृश्य अनुभवता यावे,या उद्देशाने 34 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला.
मात्र,वन विभागाच्या परवानगी अभावी काम अनेकदा ठप्प झाले.काही काळानंतर परवानगी मिळाल्याने काम सुरू झाले असले तरी तांत्रिक कारणे, प्रशासकीय प्रक्रिया आणि मंजुरींच्या टप्प्यांमुळे प्रकल्प अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

अलीकडेच दिल्ली आयआयटीने स्काय वॉकच्या रचनेबाबत महत्त्वाचे तांत्रिक सुचवले आहे.त्यांच्या अहवालानुसार,स्काय वॉकला दरीतील खालच्या भागातून अतिरिक्त सपोर्ट देणे आवश्यक आहे.
मात्र,हा बदल करण्यासाठी पुन्हा वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.त्यामुळे प्रकल्प पुन्हा काही काळ अडकण्याची शक्यता आहे.
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन असून,दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. महाराष्ट्रासह देशभरातील तसेच काही विदेशी पर्यटकांनाही या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आकर्षित करते. अशा वेळी स्काय वॉकसारखा प्रकल्प पर्यटन वाढविण्यासाठी मोठा टप्पा ठरणार होता. मात्र, कामाच्या विलंबामुळे स्थानिक व्यवसाय,हॉटेल उद्योग आणि पर्यटनसाखळीवर नकारात्मक परिणाम होत आहे.
स्थानिक नागरिक व उद्योजक यांनी प्रशासन व सरकारला या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “प्रकल्पावर कोट्यवधींची गुंतवणूक झाली आहे, पण तो पूर्ण न झाल्याने विकास थांबलेला आहे.
सरकारने तातडीने निर्णय घेऊन हे काम मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावे,” अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून केली जात आहे.
स्काय वॉकची लांबी: 407 मीटर (आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे लांब स्काय वॉक),कामाची मुदतवाढ:- मार्च 2026 पर्यंत…
सध्याची स्थिती:- काम सुरू,मात्र परवानगी व तांत्रिक अडथळ्यांमुळे गती मंद..
पर्यटन क्षेत्राची अपेक्षा….
चिखलदराला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थान मिळवून देणारा हा स्काय वॉक प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा,यासाठी नागरिक,गुंतवणूकदार आणि पर्यटनप्रेमींकडून एकमुखी मागणी होत आहे.



