Home देशविदेश वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धिस्ट स्कूल उभारणार!.. — सुप्रसिद्ध सिने अभिनेते,बौद्ध...

वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धिस्ट स्कूल उभारणार!.. — सुप्रसिद्ध सिने अभिनेते,बौद्ध उपासक गगन मलिक यांची घोषणा…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

दिनांक 3 नोव्हेंबर २०२५, वाशिम

         देशासह संपूर्ण जग पुन्हा बुद्धमय करण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार आणि संस्कार रुजवणे काळाची गरज आहे. याअनुषंगाने विदर्भातील वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धिस्ट स्कूल उभारून तथागतांचा धम्मप्रचार करणाऱ्या उपासकांची पीढी घडवणार, अशी घोषणा प्रसिद्ध सिनेअभिनेते, बौद्ध उपासक गगन मलिक यांनी केली.

             वाशिम येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाअंतर्गत नुकत्याच आयोजित भव्य धम्मच्रक प्रवर्तन सोहळ्यात मलिक बोलत होते.

         समाजातील सर्व घटकांच्या लोकसहकार्यातून युवा नेते ॲड.संदीप ताजने यांच्या देखरेखीखाली जागतिक स्तरावरचे दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे मलिक म्हणाले. बौद्ध मूल्यांवर आधारित शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याचे हे स्वप्न आहे.शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सकाळची प्रार्थना ‘बुद्ध वंदना’ असेल, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये करुणा, मैत्री, समानता आणि प्रज्ञेचे संस्कार रुजवले जातील. या शाळेची कल्पना बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून, समाज परिवर्तनाच्या कार्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रेरणास्रोत समोर राहील. ही केवळ शाळा नाही, तर भावी पिढीला मानवी मूल्ये, शांती आणि समता शिकवणारे शिक्षणाचे विहार असेल. या शाळेमुळे केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण भारत आणि जग बौद्धमय होईल, असा विश्वास मलिक यांनी यानिमित्त व्यक्त केला.

चौकट…

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी फाउंडेशन मदत करणार…

       बौद्ध धर्माच्या प्रसार-प्रसारासाठी थायलंड, श्रीलंका सारख्या देशात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या देशात मोफत शिक्षणाची सुविधा फाउंडेशनच्या मदतीने केली जाईल, असे देखील कार्यक्रमातून मलीक यांनी जाहीर केले. देशात धम्मदेसना देणारे भिक्खु तयार होणे आवश्यक आहे. वाशिम येथे एक ‘आंतरराष्ट्रीय शांती परिषद’ घेण्यात येणार असून यात ३० ते ४० देशातील प्रतिनिधी येणार आहे. देशातील बौद्ध विहारांसाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.देशात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे तब्बल ३५% लोकसंख्या आहे. ज्यादिवशी ही मंडळी एकत्रित आली तेव्हा देशाचा प्रधानमंत्री बौद्ध होईल, असा विश्वास देखील मलिक यांनी व्यक्त केला.

चौकट…

माजी न्यायमूर्ती सी.एन.थूल यांनी दिला ‘३-४-५-८-२२’चा मंत्र..

      शहरी आणि ग्रामीण भागातील मातृशक्तीमुळेच बौद्ध धम्माचे चांगले संस्कार भावी पिढीवर रूजवले जात आहे, असे मत व्यक्त करीत माजी न्यायमूर्ती सी.एन.थूल यांनी बौद्ध उपासक मातृशक्तीला वंदन केले. तथागताने सांगितलेले त्रिशरण, चार आर्यसत्य, पंचशील , अष्टांग मार्ग आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा उपासकांनी लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी मा.न्यायमूर्ती थूल यांनी ‘३-४-५-८-२२’ चा मंत्र यावेळी उपासक-उपसिकांना दिला.