Home Political आळंदीत नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी तीव्र स्पर्धा… — सामान्य कार्यकर्त्याला संधी...

आळंदीत नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी तीव्र स्पर्धा… — सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी; इतर पक्षांतील नेतेदेखील भाजपच्या तिकिटासाठी उत्सुक…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील भाजपमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या आतल्या गोटातच नव्हे तर इतर पक्षांतील काही प्रभावशाली नेतेही भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवत आहेत. त्यामुळे आळंदीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

        भाजपकडून या वेळी नगराध्यक्षपदावर आपला उमेदवार निश्चित होणार याची खात्री कार्यकर्त्यांना असून, अनेकांनी आपल्या प्रभागातून जनसंपर्क सुरू केला आहे. पक्षात जुन्या अनुभवी पदाधिकाऱ्यांसह तरुण नेतृत्वही आघाडीवर आहे. तर काही इतर पक्षातील कार्यकर्ते, माजी नगरसेवक हे देखील भाजपकडे वळण्याच्या तयारीत आहेत.

इतर पक्षांतील नेत्यांचा भाजपकडे कल…

         आळंदीतील काही प्रमुख नेत्यांनी मागील काही दिवसांत भाजपच्या स्थानिक नेत्यांशी आणि पक्षातील राज्यस्तरीय नेत्यांशी संपर्क साधला आहे. नगरपरिषदेतील सत्तेची शक्यता लक्षात घेऊन “भाजपच्या तिकिटावरून लढणे अधिक फायदेशीर ठरेल” असे अनेकांचे मत बनले आहे. काही नेत्यांनी तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आतूनच नव्हे, तर बाहेरूनही दबाव वाढला आहे.

          दरम्यान, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांतून “सामान्य, जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी” अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात भूमिका मांडली आहे. “आळंदीच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी” अशी भावना तळागाळात आहे.

        आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात बैठकींमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांच्या मतांची माहिती घेतील. निरीक्षकांकडूनही अहवाल मागवण्यात येणार आहे, स्थानिक आणि जिल्हास्तरीय समन्वयातून अंतिम उमेदवार निश्चित केला जाणार आहे.‌ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाणार असल्याने प्रत्येक इच्छुक आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.

राजकीय वातावरण रंगतदार…

        भाजपमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आणि इतर पक्षांतील नेत्यांचा भाजपकडे वाढता कल यामुळे आळंदीतील राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे. नगराध्यक्षपदाच्या तिकिटावर कोणाला संधी मिळते, याकडे केवळ भाजपच नव्हे तर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.