Home Political आळंदी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही तिकीटाची अपेक्षा… — प्रभाग ५...

आळंदी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही तिकीटाची अपेक्षा… — प्रभाग ५ मधून भाजपाचे ज्ञानेश्वर बनसोडे यांची उमेदवारीची तयारी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून यंदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी मिळावी, अशी अपेक्षा पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

        भाजपच्या प्रभाग क्र. ५ मधून निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ता ज्ञानेश्वर बनसोडे यांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणारे बनसोडे हे प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्कात असून स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

        आळंदी शहराच्या विकासात पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यास त्यांच्या अनुभवानुसार आणि जनसंपर्कामुळे शहराच्या प्रगतीस चालना मिळेल, असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले.

          ते म्हणाले, “पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला, तर आम्ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणारे कार्य करू. आळंदीला स्वच्छ, सुंदर आणि सुबक बनविणे हेच आमचे ध्येय आहे.”

         निवडणुकीचा जाहीर कार्यक्रम जाहीर होण्याची उत्सुकता वाढली असून, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.