Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : ज्येष्ठ नेत्यांना भावकीतील बंडोखोरी ठरणार डोकेदुखी…

आळंदी नगरपरिषद निवडणूक : ज्येष्ठ नेत्यांना भावकीतील बंडोखोरी ठरणार डोकेदुखी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत असून, यंदा शहरातील राजकीय घरण्यातील भावकीतील बंडोखोरी हा ज्येष्ठ नेत्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पॅनल व पक्षामधून मधून इच्छुक म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने गटांतील एकता धोक्यात आली आहे. तर एक ज्येष्ठ नेता नगराध्यक्ष पदासाठी एका पक्षाकडून तर मुलगा नगरसेवक पदासाठी दुसऱ्या पक्षाकडून इच्छुक आहे.

          गेल्या दोन कार्यकाळांत आळंदी नगरपरिषदेत अनेक राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, यावेळी उमेदवारीच्या वाटपात मतभेद उफाळले असून काही ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयांविरोधात त्यांच्या नातेवाईक व भावकी बंडखोरीच्या भूमिकेत दिसत आहेत. काही प्रभागांत भावकीतीलच स्पर्धा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

           भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या प्रमुख पक्षांत अशा अंतर्गत असंतोषाची कुजबुज सुरू आहे. काही ठिकाणी तर इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्र पॅनल स्थापन करण्याची हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोर उमेदवारांचे गणितच निर्णायक ठरू शकते, असे स्थानिक जाणकार सांगतात.

           दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बंडोखोरीला आवर घालण्यासाठी नेत्यांनी समेटाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. मात्र, काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांची नाराजी ओसरत नसल्याने पक्षश्रेष्ठींना मोठे आव्हान उभे राहिले आहे.

           आळंदी नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांवर या भावकीतील फूट आणि बंडोखोरीचा थेट परिणाम होणार असून, पुढील काही दिवसांत कोणत्या नेत्यांच्या घराण्यातील व भावकीतील बंड किती गाजते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.