Home कृषी भीमा व नीरा नदीवरील बंधाऱ्यांना ढापे टाका पिंपरी बुद्रुक व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची...

भीमा व नीरा नदीवरील बंधाऱ्यांना ढापे टाका पिंपरी बुद्रुक व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची जलसंपदा विभागाकडे मागणी…

  बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

         इंदापूर तालुक्यात परतीच्या पावसाने अखेर काढता पाय घेतला असून, भीमा नदीतील उजनीचे पाणी कमी करण्यात आले आहे. नीरा नदीचेही पाणी वाहण्याचे मंदावले आहे. त्यामुळे भीमा नदीवरील तीन व नीरा नदीवरील दहापेक्षा अधिक बंधाऱ्यांचे ढापे टाकून पाणी अडवण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. अन्यथा वर्षभर पिकांना पाण्याविना जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

        भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर, तर नीरा नदीवरील संगम, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी, नीर निमगाव, भगतवाडी, निरवांगी, खोरोची आदींसह बंधाऱ्यांना ढापे टाकण्यात आली नसल्यामुळे पाणी वाहून चालले आहे.

      नरसिंहपूर (ता. इंदापूर) नीरा नदीवरील बंधाऱ्याला ढापे न टाकल्याने वाहून जात असलेले पाणी.

       विभागाच्या शासकीय नियमानुसार प्रतिवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस १८ ऑक्टोबर दरम्यान नदीवरील सर्व बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्याचा नियम आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील पंधरवडा संपत आला असतानाही अद्याप ढापे टाकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पाणी वाहून जाऊन बंधारे रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही नदी परिसरातील शेती पाण्या अभावी उजाड बनण्याची शक्यता आहे.

       कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यामध्ये लक्ष घालून नीरा व भीमा नद्या वरील बंधाऱ्यांना ढापे टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, संचालक श्रीकांत बोडके, ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, नवनाथ रुपनवर,माजी संचालक महादेव घाडगे. जिल्हा सरचिटणीस सुरेश शिंदे सर, माजी संचालक हरिदास घोगरे, संग्रामसिंह पाटील, उपसरपंच संतोष सुतार , आदर्श शेतकरी केशव बोडके, मा.सरपंच सोमनाथ मोहिते, विक्रम मोहिते, सरपंच नितीन सरवदे, सरपंच पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासो क्षिरसागर, माजी सरपंच श्रीकांत दंडवते, उद्योजक अरुण क्षीरसागर, माजी उपसरपंच आनंद काकडे, उपसरपंच विठ्ठल पवार, नाथा रुपनवर, सरपंच सुनील जगताप, माजी सरपंच उस्मान शेख, माजी सरपंच विलास सुळ, गोविंद सुळ, कैलास बंडगर, मच्छिंद्र खटके, राजू बळवंतराव, शशिकांत सूर्यवंशी आदी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

पाणी अडविण्याची गरज…

          यावर्षीच्या पावसामुळे नीरा नदीवरील गिरवी व ओझरे बंधाऱ्याचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. तसेच, दोन वर्षांपासून बंधाऱ्यात नादुरुस्तीमुळे पाणी अडवण्यात आले नसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चालू वर्षीही पाऊस काळ चांगला झाला असून, पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. आता फक्त बंधाऱ्यांची डापे टाकून पूर्ण क्षमतेने पाणी अडवणे गरजेचे असल्याचे संचालक श्रीकांत बोडके, उपसरपंच संतोष सुतार सह आधी सर्व शेतकऱ्यांनी सांगितले.