ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :– समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आजाद समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनाशी लभाने यांनी निराधार व कोविड विधवा महिलांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे लभाने यांनी सांगितले की, “कोविड काळात पती गमावलेल्या तसेच इतर विधवा महिला आजही सामाजिक, आर्थिक व मानसिक संकटात आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ अपुरा असून, त्यात तातडीने सुधारणा होणे आवश्यक आहे.”
ठोस मागण्या…
1️⃣ निराधार भत्ता किमान ₹3000/- करण्यात यावा. महिलांना स्वतःच कुटुंबाचा आधार बनावे लागते, त्यामुळे विद्यमान ₹1500/- भत्ता अपुरा आहे.
2️⃣ कोविड विधवांसाठी बालसंगोपन निधी ₹5000/- पर्यंत वाढवावा आणि शिक्षणासाठी वयमर्यादा 21 वर्षे करण्यात यावी.
3️⃣ विधवा महिलांसाठी बिना व्याजी कर्ज व रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्या आत्मनिर्भर बनू शकतील.
4️⃣ घरकुल योजनेतील निधी ₹3 लाखांपर्यंत वाढवावा, कारण महिलांना कुटुंबाचा संपूर्ण भार सांभाळावा लागतो.
सोनाशी लभाने यांनी सांगितले की, “या मागण्या मानवतेच्या दृष्टीने योग्य असून शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत. अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू.”
या निवेदनावेळी आजाद समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाशी लभाने यांचे सह गडचिरोली तालुकाध्यक्ष सविता बांबोळे तथा निराधार महिला मनीषा उपासे, मंदा हुमणे, बबिता ब्रम्हनायक, रेखा जेंगठे, वैशाली ठेंगरे आदी महिला उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरण आणि न्यायाच्या लढ्यात आजाद समाज पार्टी ठामपणे महिलांच्या पाठीशी उभी असल्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.



