दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आळंदी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षात अनेक वरिष्ठ व स्थानिक नेत्यांमध्ये नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगली असून, भाजपचे युवा नेते व माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर पक्षाचे पुणे जिल्हा सचिव व माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे, मा.नगरसेवक पांडुरंग वहीले आणि मा.उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले या तिघांचीही इच्छुक म्हणून नावे चर्चेत आहेत.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, आळंदी नगराध्यक्षपद या वेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपकडून नवीन नेतृत्व पुढे आणण्याच्या चर्चेला वेग आला आहे. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जय गणेश ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित कार्यातून स्थानिक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा विश्वास त्यांच्याकडे आहे.
दरम्यान, भाजपचे माजी शहराध्यक्ष व सध्या जिल्हा सचिव असलेले किरण येळवंडे हेही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला. शहरातील विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याने पक्षातील वरिष्ठांना त्यांचा अनुभव आणि संघटनकौशल्य लक्षात येत आहे.
तसेच गटनेते पांडुरंग वहीले आणि नगरसेवक सचिन गिलबिले हे दोघेही आपापल्या प्रभागात मजबूत जनाधार असलेले आणि कार्यकर्त्यांशी घट्ट संपर्कात असलेले नेते आहेत. त्यामुळे पक्षात सध्या “कोणाला अंतिम हिरवा कंदील मिळणार?” याबाबत उत्सुकता आहे.
पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार निवड प्रक्रियेत स्थानिक कार्यकर्त्यांचे मत, जनाधार, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे. आगामी काही दिवसांत वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आळंदी शहरात भाजपचे संघटन मजबूत असून, नगराध्यक्षपदासाठी सत्तेची लढत यावेळी अत्यंत चुरशीची होणार आहे.



