Home सांस्कृतिक अवधूत गांधी यांच्या गायनाने आळंदीत रंगला संगतीचा जागर…

अवधूत गांधी यांच्या गायनाने आळंदीत रंगला संगतीचा जागर…

दिनेश कुऱ्हाडे 

 उपसंपादक 

आळंदी : भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात संगतीचा जागर अवघ्या श्रोत्यांना भावला. श्री. दत्तनगर प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव सोहळ्यात मंगळवारी रात्री सुप्रसिद्ध गायक अवधूतजी गांधी व सहकलाकारांनी सुमधुर गायनाची मैफल सादर केली. त्यांच्या गाण्यांनी उपस्थितांच्या हृदयाला थेट स्पर्श करत भक्तिमय वातावरण रंगवले.

        कार्यक्रमाला आळंदी परिसरातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवधूत गांधी यांनी भक्तिगीते, अभंग, गोंधळ, पोवाडा, भारुड आणि गवळणी यांच्या माधुर्यातून लोकगीतांचा परंपरेचा संदेश दिला. त्यांच्या साथीला वादकांच्या सुरावटींनी कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. ‘जय देवी दुर्गा’, संत ज्ञानेश्वर माउलींची गीते, छत्रपती शिवरायांच्या चित्रपटातील गीते तसेच वारकरी परंपरेतील अनेक लोकप्रिय रचना यांनी संगीत जागराला नवा आयाम दिला.

        गायनाच्या प्रत्येक आवर्तनाला टाळ्यांचा कडकडाट व ‘हरिनामाचा गजर’ याने दणाणून टाकले. श्रोत्यांनी उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

        संगतीच्या जागरानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे आणि मान्यवरांनी अवधूत गांधी यांचा सन्मान करून आभार मानले. आळंदीतील सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करणारा हा सांगितिक जागर भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.