Home देशविदेश भक्ती आणि कर्मकांड…

भक्ती आणि कर्मकांड…

          ज्या कर्मात किंवा कार्यात सेवा श्रद्धा निष्ठा विश्वास असतो ,असे कर्म म्हणजे भक्ती होय.आणि हळद कुंकू उदक अक्षदा गंध ,साखर फुल नारळ फळ युक्त पूजा,पोथी वाचन,श्लोक पठण,तीर्थयात्रा, वारी,नवस,भंडारा, गायबैल देवास सोडणे,पाळणे बांधणे,देवाच्या नावाने बकऱ्याचे कोंबड्यांचे जेवण देणे,नैवेद्य,महापूजा, अनुष्ठान, भजन पूजन,एकादशी,द्वादशी करणे,देवाचा उपवास , गंगास्नान,कुंभमेळा,देवाची पालखी,जत्रा यात्रा इत्यादी गोष्टी या कर्मकांडात मोडतात.अर्थात देवाच्या नावाने केलेले कर्मकांड देवालाही आवडत नाही.

         काय आवडते तर ” हेचि थोरभक्ती आवडते देवा,भाव तो निराळा नाही दुजा ” असे वारकरी संप्रदाय चे तत्वज्ञान आहे.मुखी नाम हाती काम ही भक्तीची पद्धत आहे.देवाला फक्त दोन हात आणि एक मस्तक बास्स आहे. ” आणिक न काही पाहिजे देवा “. असे संत सांगतात,पण अंधभक्त मानीत नाहीत. 

        ” नवसे पुत्र होती ,तरी का करणे लागे पती ?” असे तुकाराम महाराज सांगून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत.तरी अंधभक्त कर्मकांड सोडत नाहीत.भाव तेथे देव.हेच सत्य आहे.देव भावाचा भुकेला आहे.तुमच्या द्रव्याचा वस्तूंचा,नवसाचा,यात्रा जत्रेची त्यास आस नाही.

       भक्त मनोभावे हातात काम घेऊन त्याची आठवण केली,त्यावर श्रद्धा ठेवली तरी बस आहे.पैसा,सोने,चांदी,नैवद्य, बेलफुल,नारळ,धनद्रव्य,शेती,त्याला नको आहे.कारण ही सारे त्याचेच आणि त्याचीच निर्मिती आहे.तुमची नाही.

          निसर्गनिर्मित जे काही आहे,ते सारे त्याचेच आहे.असे असताना मग त्याचेच घेऊन त्यालाच देण्यात काय मतलब ? काय अर्थ ? हे सारे कर्मकांड केवळ दिखाऊ,निरर्थक आणि निष्फळ आहे.

         देव तुझ्या हृदयात आहे,मंदिरी राउळी नाही,आकाशात,वैकुंठात नाही.कुठेच नाही. तो प्रत्येकाच्या हृदय मधे आहे.म्हणजे मनात आहे.मनात याचा अर्थ मानण्यात आहे.हृदयात म्हणजे तिथे त्याचे वास्तव्य नसते.तर मनाचे प्रतीक म्हणजे हृदय होय,दिल होय.

       एखाद्या प्रियकराने त्याच्या प्रियाशीला हृदयात बसविले,किंवा प्रेयसीने आपले दिल त्यास दिले,याचा अर्थ छातीतील दिल नावाचा पार्ट कापून दिला,असे नव्हे,काळीज दिले तर तिचे मरण अटळ आहे.

        म्हणून दिल म्हणजे मन,मन म्हणजे भावना,भावना म्हणजे विश्वास-श्रद्धा-भक्ती असणे.भक्ती एक मानसिकता आहे.मनाचा खेळ आहे.मनाचा एक प्रयोग आहे,जो भक्त करतात,प्रियकर प्रियशी करते.

      कर्मकांडात भक्ती नसते.ती केवळ क्रिया असते.फरक एवढाच की,भक्तिभावे केलेले कर्मकांड म्हणजे ओलावा.आणि भक्तिभावे न केलेले,म्हणजे स्वार्थापायी केलेले कर्मकांड म्हणजे कोरडी भक्ती होय.मात्र ओले असो की रुक्ष कर्म,शेवटी ते कर्मकांडच होय.जी चुकीची,निरर्थक क्रिया होय.अंधश्रद्धा पण होय.डोळस श्रद्धा नव्हे.विचारपूर्वक केलेली कृती नव्हे.

         खरी भक्ती म्हणजे, भक्त देवाला भेटायला जात नाही,इकडेतिकडे शोधीत नाही,कारण त्यास माहीत असते की,देव तीर्थांचे ठिकाणी,आकाशात,काशीत,तिरुपती,पंढरपूरला नाही,तर तो भक्ताच्या हृदयात असतो.एक गीत आहे ” कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी,हृदयात भगवंत राहिला उपाशी.”

       “शोधिसी मानवा,राउळी मंदिरी,नांदतो देव हा आपुले अंतरी “. अशी गीत रचना खऱ्या भक्तांनी केली आहे. जी खोट्या आणि आंधळ्या भक्ताना समजत नाही.आवडत पण नाही.

      असो.भक्ती आणि कर्मकांड यातील फरक सांगण्यासाठी किंवा समजण्यासाठी हे चिंतन आहे.याचा अर्थ मी देवभक्त आहे,असा नाही.कारण देवाच्या अस्तित्वाचे चिंतन मी केले नाही.

     लेखक :– दत्ता तुमवाड…

        सत्यशोधक समाज नांदेड…

दिनांक : 23 सप्टेंबर 2025.फोन : 9420912209.