दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : गणेशोत्सवात दरवर्षी विविध ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले जातात. यंदा आळंदी शहरात अमित जयसिंग कुऱ्हाडे यांनी त्यांच्या घरी साकारलेल्या ‘बाबा महाकाल भस्म आरती’ या देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगातील पहाटेची भस्म आरती नेत्रदीपक असते. त्याच आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा भास आळंदीतील गणेशभक्तांना होत असून हा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आळंदी येथील विलास कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, अमित कुऱ्हाडे, अक्षय कुऱ्हाडे यांनी विशेष परीश्रम घेऊन मंडपात उभारलेले महाकाल मंदिर, सजवलेले नंददीप, आरतीचे मंत्रोच्चार व पार्श्वभूमीवर वाजणारे भजनी संगीत यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय झाले आहे. शिवभक्तांसह गणेशभक्त भाविकांनी या देखाव्यास मोठी गर्दी केली आहे. सकाळ-संध्याकाळ दर्शनासाठी येणारे भाविक ‘हर हर महादेव’च्या घोषात भस्म आरतीचा अनुभव घेतात.
‘बाबा महाकाल भस्म आरती’चा देखावा हा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला असून, शहराबाहेरील भाविकही दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या देखाव्यामुळे आळंदीकरांना उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची प्रत्यक्ष अनुभूती मिळत असल्याची भावना व्यक्त होत असून, गणेशोत्सवातील हा देखावा भाविकांसाठी अद्वितीय अध्यात्मिक अनुभव ठरत आहे.



