दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदीतील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी आकर्षक देखावे साकारले असताना राजे ग्रुप तर्फे उभारण्यात आलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधुन “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” हा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग प्रभावीपणे उलगडणारा हा देखावा श्रद्धाळूंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने अलौकिक कृती घडवून आणल्याचे प्रसंग मराठी संतसाहित्य व लोककथांमधून प्रसिद्ध आहेत. त्यातीलच “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या प्रसंगाचे अत्यंत प्रभावी व वास्तव दर्शनवापरत राजे ग्रुपने या देखाव्यातून घडवले आहे. विद्युत सजावट, ध्वनी-प्रकाश योजना व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेला हा देखावा पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाचा भास घडवतो.
देखावा पाहण्यासाठी शहरातील तसेच बाहेरील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हा देखावा मंत्रमुग्ध करतो आहे. राजे ग्रुपचे पदाधिकारी आप्पा पगडे यांनी सांगितले की “आमच्या देखाव्याचा उद्देश केवळ दर्शन व आकर्षण नव्हे तर समाजाला संतांच्या शिकवणीचे महत्त्व पटवून देणे हा आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला अध्यात्मिक आणि नैतिक संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.” गणेशोत्सवात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच अशा देखाव्यांमुळे आळंदीतील वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.



