ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तर त्यांनी काय करावे? कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्यही होणार नसते. म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.
शहरातील पंचशील वार्डातील समता चौकात भरविण्यात आलेल्या तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटीची प्रशंसा करीत होते.
वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो मोठमोठ्या काष्ठशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. कुणी शेतकऱ्यांची, कुणी कृष्णाची, कुणी सोल्जरची, तर कोणी कोणाची वेशभूषा करून आकर्षक रित्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते.
उत्कृष्ट सजावट तसेच वेशभूशेत आलेल्या चिमुकल्या सर्व स्पर्धकांना प्रशांत राऊत, आनंद नंदागवळी, व्यंकटेश येवले, मंगेश ठेंगरी,चेतक हत्तीमारे,शरद उरकुडे, चंद्रशेखर येवले,अचल बंसोड तेजस राऊत, भास्कर येवले यांच्या हस्ते आकर्षक पुरस्कार देण्यात आले.



