Home सांस्कृतिक शेतकरी संस्कृतीची बालमनोहर झलक तान्हा पोळा फ्युचर पोदार लर्न शाळेत मोठ्या उत्साहात...

शेतकरी संस्कृतीची बालमनोहर झलक तान्हा पोळा फ्युचर पोदार लर्न शाळेत मोठ्या उत्साहात साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : फ्युचर पोदार शाळेत मोठ्या हर्षोलासात तान्हा पोळा सण सर्व बालगोपालांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

       यावेळी सर्व बालगोपाल शेतकऱ्यांसारखी वेशभूषा परिधान करून आपला नंदी सजवून शाळेत मोठ्या उत्साहात आले होते. धोतर , लुगडं, डोक्यावर टोपी घातलेले बालगोपाल शेतकरी आणि त्यांचा लाकडी आणि मातीचे नंदी आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षक होते.

        सर्वप्रथम संचालिका सौ.नमिता तुमसरे, प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी सर्व बालगोपाल व नंदीचे विधिवत पूजन करून औक्षण केले. मान्यवरांनी पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

        संचालिका नमिता तुमसरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी सणाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.

        शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान खूप मोठे असून ते शेतकऱ्यांचे खरे साथीदार आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्याचे सर्व श्रम कमी करून, अन्नदात्याला मदत करणारे हे बैल म्हणजेच खऱ्या अर्थाने कुटुंबातील सदस्यच.

        बैलांशिवाय शेती अपूर्ण आहे, आणि म्हणूनच शेतकरी आपल्या बैलजोडीला देवतासमान मानून दरवर्षी पोळ्याच्या दिवशी त्यांचा सन्मान करतो. हा सण म्हणजे कष्टकरी शेतकऱ्याचा आपल्या जीवाभावाच्या साथीदाराला दिलेला सन्मान होय.

      प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी सांगितले की बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.

       समन्वयक राजीव समरीत यांनी तान्ह्या पोळ्याचे बालगोपालांशी असलेले नातं उलगडून सांगितले. सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामा पासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते.

      लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना सांभाळू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा’ साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. 

        शिक्षिका पल्लवी ओझा यांनी शेतकरी गीतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षिका यास्मिन तुरक यांनीसुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.

         याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार विविध प्रकारचे देखावे लक्ष वेधून घेत होते. शेतकरी संस्कृतीची झलक आज पाहायला मिळाली. सर्व बालगोपाल, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसहकार्यातून साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सांगता गोड खाऊ वितरण करून झाली.