शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुका अंतर्गत असलेल्या मौजा आंबोली येथील वृध्द महिला – पुरुषांना संजय गांधी निराधार योजनांचे रुपये मागिल आठ महिन्यांपासून मिळाले नाही.
यामुळे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थी असलेल्या वृध्द महिला – पुरुषांचे जिवन जगणे मुश्कील झाले आहे.संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे त्वरित मानधन देण्यात यावे अशी मागणी आंबोली येथील उपसरपंच वैभव बाबा ठाकरे यांनी केली आहे.
याचबरोबर आंबोली गावातीलच नाही तर अख्खा महाराष्ट्रातील वृद्ध,विधवा,अपंग,परित्यक्ता,रुग्ण यांचे पगार (अनुदान) गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बॅंक अकाऊंटवर जमा झालेले नाहीत.
ज्यांच्या द्वारे आता कष्टाचे कामे करणे शक्य नाही,ज्यांना कोणी पोसणारे नाही अश्यांना आरोग्य उपचारासाठी,उपजीवीकेसाठी नियमित रक्कम मिळणे गरजेचे असताना शासन अजूनही अनुदान वेळेवर देत नाही हे धक्कादायक आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी,त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दि.24/07/2025 ला ग्राम पंचायत आंबोली येथे सभा आयोजित केली होती.
यावेळी वृद्ध,विधवा महिला,पुरुष यांनी आपापली समस्या सांगितली आणि निश्चितच ग्राम पंचायत आंबोली त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन सरपंच,उपसरपंच वैभव बाबा ठाकरे,सदस्य ग्राम पंचायत आंबोली यांनी दिले..



