Home शैक्षणिक ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाच्या पाचव्या वर्गाचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा...

‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाच्या पाचव्या वर्गाचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण व संस्कार रुजवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाच्या पाचव्या वर्गाचा शुभारंभ श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाराज काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक लक्ष्मण बालवडकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, सुभाष महाराज गेठे, श्रीधर घुंडरे, धनाजी काळे, अनिल वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

        या प्रसंगी चतुर्थ वर्गातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा, हरिपाठ पाठांतर व अर्थ विवेचन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना संतांच्या नवलकथा पुस्तके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच नववर्षासाठी सहभागी विद्यार्थ्यांना फाईल व ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचे वाटप करण्यात आले.

        सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, ‘ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नसून एक जीवनशास्त्र आहे’, आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात हे विचार रुजवण्यासाठी हा उपक्रम आवश्यक आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास १०० शाळांनी हा उपक्रम स्वीकारला हेच त्याचे यश आहे, असेही त्यांनी नमूद केले.

        कार्यक्रमात गायत्री लोहोर व राधिका फपाळ या विद्यार्थिनींनी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” उपक्रमामुळे त्यांच्या विचारांमध्ये झालेला सकारात्मक बदल विषद केला. प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून संत विचारांचा प्रचार करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष सुरेश वडगावकर व लक्ष्मण बालवडकर यांनी हा उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

          सुभाष महाराज गेठे यांनी मागील पाच वर्षांत झालेल्या सकारात्मक सामाजिक बदलाची माहिती दिली आणि सर्व शाळांमध्ये हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले तर प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी आभारप्रदर्शन केले.