Home Maharashtra श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा संपन्न; राजोपचार पुन्हा सुरू…

श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा संपन्न; राजोपचार पुन्हा सुरू…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा आज बुधवार, दि. १६ जुलै रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. मंदिर समिती सदस्य श्री भास्करगिरी बाबा व ह.भ.प.प्रकाश जवंजाळ यांच्या हस्ते ही पूजा पार पडली.

       या प्रक्षाळपूजेपूर्वी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींना पहिले स्नान घालण्यात आले. त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेचे अलंकार परिधान करून विधिवत पूजन करण्यात आले. आषाढी यात्रेच्या काळात भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन मिळावे या उद्देशाने दि. २७ जून रोजी श्रींचा पलंग काढण्यात आला होता आणि राजोपचार तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

      आजपासून श्रींची काकडा आरती, नित्यपूजा, पोशाख, धुपारती, शेजारती यांसह सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. यानिमित्ताने रात्री शेजारतीवेळी श्रींना आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्यही दाखवण्यात येणार आहे, जेणेकरून देवाचा थकवा दूर होईल अशी श्रद्धा आहे.

       या मंगलप्रसंगी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि पौराहित्य करणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

       श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या प्रक्षाळपूजेनंतर मंदिर परिसर भक्तांच्या जयजयकारांनी निनादला आणि पुन्हा एकदा भक्तिभावाने नटलेले पंढरपूर राजोपचारांच्या साक्षीने उजळून निघाले.