Home Maharashtra कात्रज प्राणी संग्रहालयात १६ चितळ हरणांचे रहस्यमय मृत्यू : प्रशासन तपासात व्यस्त,...

कात्रज प्राणी संग्रहालयात १६ चितळ हरणांचे रहस्यमय मृत्यू : प्रशासन तपासात व्यस्त, नागरिकांमध्ये चिंता…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल १६ चितळ (Spotted Deer) हरणांच्या अचानक मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे प्राणीप्रेमी, पर्यटक व स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

         या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक सखोल तपास करत असून, मृत चितळांचे अवयव आणि रक्ताचे नमुने देशभरातील विविध प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

        प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव यांनी सांगितले की, “या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचे अहवाल लवकरच अपेक्षित आहेत. प्राण्यांच्या आहार आणि निवासाच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेतली जात आहे.”

       दरम्यान, या घटनांमुळे प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी ‘एक्स’ (Twitter) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कात्रज प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांत १४ हरणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. या मृत्यूंमागे आहार किंवा अन्य बाबींतील निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याचा तपशीलवार तपास होणे आवश्यक आहे.” त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

प्राणी संग्रहालयाची पार्श्वभूमी…

        कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे सुमारे १३० एकर क्षेत्रफळावर विस्तारलेले असून येथे ६० हून अधिक प्रजातींचे सुमारे ४३० प्राणी आहेत. यामध्ये सिंह, वाघ, बिबट्या, हरण, गवा, साप आणि पक्ष्यांचा समावेश आहे. १९९९ साली पेशवे पार्क येथून हे संग्रहालय कात्रज येथे स्थलांतरित करण्यात आले आणि त्यानंतर याला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी सुमारे २२ लाख पर्यटक येथे भेट देतात, ज्यामुळे हे पुण्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ मानले जाते.

       ही घटना भविष्यातील व्यवस्थापन, निगा आणि जीवसुरक्षेच्या उपाययोजनांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज अधोरेखित करते. अहवालानंतरच या मृत्यूमागील प्रत्यक्ष कारणे स्पष्ट होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.