Home Maharashtra पंढरपूरमध्ये लाखों वारकरी रांगेत असताना आमदार संतोष बांगर यांना २१ कार्यकर्त्यांसाठी हवं...

पंढरपूरमध्ये लाखों वारकरी रांगेत असताना आमदार संतोष बांगर यांना २१ कार्यकर्त्यांसाठी हवं VIP दर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पंढरपूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहून हे भाविक विठुरायाच्या दर्शनाची वाट पाहत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या २१ कार्यकर्त्यांना व्हीआयपी पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी थेट मंदिर समितीला पत्र दिलं आहे.

        मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यंदा स्पष्ट आदेश दिले आहेत की, विठ्ठल मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शनाची परवानगी दिली जाणार नाही. या आदेशानंतर मंदिर समितीनेही परिपत्रक प्रसिद्ध करून, “वशिल्याचे दर्शन” थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही लोकप्रतिनिधी मात्र याला अपवाद ठरवू पाहत आहेत. आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या लेटरहेडवर एक पत्र लिहून देवस्थान समितीला दिलं आहे. या पत्रात २१ कार्यकर्त्यांची नावे दिली असून, त्यांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंढरपूरच्या मंदिर परिसरात त्या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. हे पत्र समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे लाखो सामान्य भाविक कडक उन्हात, पावसात तासनतास उभे राहत विठुरायाचं दर्शन घेत आहेत, तर दुसरीकडे आमदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी ‘शॉर्टकट’ शोधत आहेत, यावरून वारकरी संप्रदायात आणि समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

       दरम्यान, याबाबत आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

मंदिर प्रशासनाचं परिपत्रक…

      मंदिर समितीने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं की, “आषाढी वारी दरम्यान वाढत्या गर्दीमुळे कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला विशेष प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांना समान संधी देत सुलभ व वेळेवर दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल.”

‘राजकारण विरुद्ध श्रद्धा’चा संघर्ष..

     ही घटना राजकीय हस्तक्षेप आणि भाविकांच्या श्रद्धेतील संघर्ष स्पष्ट करते. शेकडो किलोमीटर चालत आलेल्या वारकऱ्यांना सामान्य रांगेत उभे राहण्याची वेळ येते, तर काहीजण राजकीय वशिल्याच्या बळावर थेट देवळात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.