Home देशविदेश अस्मिता : व्याख्या,व्याप्ती,परिणाम…

अस्मिता : व्याख्या,व्याप्ती,परिणाम…

व्याख्या : अस्मिता म्हणजे “स्वत्व आणि अस्तित्व याचे महत्व वाटणे”.
निर्मिती : हक्क अधिकार प्राप्तीची मनिषा वाटणे किंवा विचार येणे.
व्याप्ती : स्वत्व जपणे यासाठी वंशत्व जपणे यासाठी घराणे जपणे,यासाठी घराणेशाही आणि त्यातून राज्यशाही,त्यातून हुकुमशाही.यासाठी सत्ता संपती प्रतिष्ठा यांची जपवणूक आणि विस्तार करणे,यातून साम्राज्यशाही निर्माण होणे.

      स्वत्व जपण्यासाठी घराणे आणि जातीची निर्मिती करणे ही आवश्यक गरज होऊन बसते.अर्थात जातीचे मुळ ” वंशत्व ” जपण्यात आहे.म्हणून जातीचा गर्व किंवा अभिमान निर्माण झाला,किंवा केल्या जातो.

    देव धर्म राष्ट्र यांची पण आवश्यकता वाटायला लागली,याचे कारण ” स्वत्व ” जपण्यासाठीच.कारण स्वत्व जपण्यासाठी ( संपती सत्ता प्रतिष्ठा ) जेंव्हा स्वतःची ताकद कमी पडते,तेंव्हा माणूस समूहाचा आधार घेतो,म्हणजेच स्वत्व जपण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करणेसाठी तो एकटा कमी पडतो,म्हणून तो इतरांचे साह्य घेतो,त्यातून समूह निर्माण होतो,कींव बनवितो.हा समूह शक्य तेव्हढे आपल्या रक्ताचा ,वंशाचा बनवितो,म्हणजेच जातीचा आधार घेतो.याचा अर्थ माणूस स्वतःसाठी म्हणजेच माणूस म्हणून आपले हक्क अधिकार जेंव्हा एकट्याळमुळे किंवा दोघांमुळे मिळत नसतात तेंव्हा तो दोन पेक्षा जास्त म्हणजे आधी कुटुंब ,नंतर घराणे,नंतर नातेवाईक,नंतर जात अशी स्वत्वाची व्याप्ती वाढवितो.यातून जात समूह निर्माण करतो,यामुळे या टप्प्यावर त्यास हक्क अधिकार हे व्यक्तिगत न राहता सामूहिक म्हणजे समूहाचे बनतात,परंतु याचे भान जेव्हा नसते तेव्हा माणूस समूहात पण स्वत्व जपण्याच्या अभिलाषा पोटी,स्वार्थ म्हणून समूहाचा फायदा घेऊन,म्हणजे जातीचा वापर करून स्वत्व.जपण्याचा म्हणजे सारे हक्क आणि अधिकार केवळ आपणच मिळविण्याचा कींव आपल्याकडेच ठेवण्याचा दुष्ट प्रयत्न करतो, यासच विकृती ,दुराचार,किंवा महत्वाकांक्षा किंवा राजकारण म्हणतात.या टप्प्यावर माणूस राजकारणी बनतो.

     जेंव्हा स्वतःची महत्वाकांक्षा अपुरी पडते ,तेव्हा स्वार्थी माणूस ” धर्माचा ” म्हणजे मोठ्या समूहाचा आधार घेतो,ज्यात अनेक जातींचे समूह असतात.अर्थात धर्म म्हंटले की देव आलाच.मग देवाचा पण आधार घेतो.म्हणजेच स्वत्व जपण्यासाठी माणूस वंश,जात,धर्म,देव,प्रांत,राष्ट्र या सर्व अस्मितांचा या शिवाय या अस्मितांच्या विरासतीचा पण फायदा उठवतो,म्हणजेच परंपरांचा पण फायदा घेतो.कारण विरासत परंपरा या गोष्टीत पण अस्मिता दडलेली असते.

     स्वतःबद्दल स्वतःचा माणसाला जसा गर्व अभिमान दर्जा प्रतिष्ठा मान असतो तसाच वंश जात धर्म राष्ट्र यांचा पण अभिमान असतो.समूहासाठी देशासाठी धर्मासाठी ” अभिमान ” हा शब्द वापरण्याची परंपरा किंवा पद्धत आहे,आणि स्वतःसाठी ” गर्व ” हा शब्द वापरल्या जातो.याचा अर्थ गर्व हा शब्द निजी म्हणजे जवळचा आहे.म्हणून माझ्या अगदी जवळचे,असे दर्शवायचे झाल्यास ‘ गर्व ‘ हा शब्द प्रयोग केल्या जातो.उदा.” गर्वसे क हो हम हिंदू है “. ही घोषणा.

       अर्थात व्यक्ती , वंश ,जात , धर्म ,देश या संकल्पना किंवा गोष्टी जरी अस्मितेच्या असल्या ,( नव्हे केल्या गेल्या,स्वार्थासाठी),तरी सखोलता आणि व्यापकता यापुढे या संकुचित आणि थिटेच आहेत.कारण व्यापक्तेत जी सखोलता आणि विशालता आहे,ती संकुचतेत नसते,जसे की,सागराची सखोलता,आभाळाची विशालता,व्यापकता, उँची याची सर कशालाही नसते.ही सखोलता,व्यापकता,विशालता यासाठी माणसाची बुद्धी ,विचार,मन,भावना पण अशाच असाव्या लागतात.त्यासाठी चिंतन मनन ध्यास शोध संशोधन विश्लेषण विवेचन समीक्षण परीक्षण प्रयोग अनुभव या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो,तेंव्हाच माणसाचा महामानव बनतो.तेंव्हा त्याच्या पायातील.हातातील संकुचित अस्मितेच्या बेड्या गळून पडतात,आणि तो समाजवादी साम्यवादी समतावादी बनतो.नाहीतर वंश लिंग जात धर्म राष्ट्र या संकुचित डबक्यात माणूस जीवजंतू किडे होऊन जगतो.संकुचित विचारांच्या म्हणजेच ज्याला फक्त पायाजवळचेच दिसते,जिथे आभाळ आणि जमीन यांचा संयोग दिसतो ते क्षितिज अशा स्वार्थी संकुचित लोकांना दिसत नाही.स्वार्थी माणसाला बेडकाप्रमाणे आपले विश्व म्हणजे विहिरी एव्हढेच वाटते.आणि निस्वार्थी माणसाला ” विश्वाची हे माझे घर,सारी माणसे माझे बांधव ” वाटायला लागतात,तेंव्हा कुठे प्रेम सत्य अहिंसेचा उदय होतो.

      अती स्वार्थी लोभी माणसाचे केवळ स्वतःचाच विचार केला,इतरांचा समाजाचा देशाचा विश्वाचा विचार नाही केला,म्हणूनच या जगात ” समता स्थापित होण्या ऐवजी विषमता निर्माण झाली.आणि विषमतेची ही अस्मिता नष्ट करून समतेची अस्मिता निर्माण करण्याची खरी गरज आहे.

    परिणाम : स्वत्वाची अस्मिता जपल्याने त्यातून वंश लिंग जात धर्म राष्ट्र निर्माण झाले.हे सारे विषमतावादी व्यवस्थेचे परिणाम आहेत.गुलामाला गुलामीची जाणीव करून देणे ,याचा अर्थ त्यास त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून देणे,हा अर्थ जरी असला,तरी हक्क आणि अधिकार हे स्वतःसाठी वापरायचे नसून समाजासाठी समाजाची एकता,राष्ट्राची अखंडता,आणि विश्वातील शांतता जपण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठीच हक्क अधिकार वापरायचे असतात,कारण आपले हित आपल्यात शोधले तर सापडणार नाही,तर आपले हित हे सर्वांच्या हितात आणि अधिकारात निहीत आहे,याची जाणीव,आणि यातून समता,आणि समतेची अस्मिता याची जाणीव होणे गरजेचे आहे.

   लेखक : दत्ता तुमवाड

     सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 29जून 2025.फोन: 9420912209.

टिप: आज नायगाव येथे समतावादी कार्यकर्त्यांचे “अस्मिता ” या विषयावर शिबिर आहे,या निमित्ताने हा लेख वाचकांच्या सेवेत सादर.