Home Maharashtra विठ्ठलभक्तीला धर्माची सीमा नाही! लातूरच्या गणी सय्यद यांनी अर्पण केला विठुरायास चांदीचा...

विठ्ठलभक्तीला धर्माची सीमा नाही! लातूरच्या गणी सय्यद यांनी अर्पण केला विठुरायास चांदीचा मुकुट…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर : देव एक आहे आणि भक्तीला कुठलाही धर्म, जात किंवा भिंत आडवी येत नाही, याचा उत्कट संदेश लातूर येथील गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने दिला आहे. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद यांनी तब्बल एक लाख रुपये किमतीचा, एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट थेट पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण केला.

       गाभाऱ्यात शिरून विठ्ठलमूर्तीसमोर लीन होणाऱ्या गणी सय्यद यांच्या भक्तीने उपस्थितांचे अंतःकरण भारावून गेले. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. गणी सय्यद यांना विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात दगड फोडण्याची जबाबदारी मिळाली होती. हळूहळू मंदिरात येणं-जाणं वाढलं आणि एक दिवस त्यांच्या मनातल्या श्रद्धेने विठ्ठलभक्तीचं वेलू फुलवायला सुरुवात केली. धर्म, जात, पंथ या सर्व भिंती मागे पडल्या आणि उरला तो फक्त शुद्ध अंतःकरणाचा भक्तिभाव.

       “मी मुस्लिम असलो तरी भजन-कीर्तन ऐकतो. देव एकच आहे, भाव मनात शुद्ध असावा लागतो,” असे गहिरे शब्द गणी सय्यद यांनी व्यक्त केले. त्यांच्या या पावन भक्तीने वारकरी संप्रदायाच्या “समतेच्या” तत्वाला नवसंजीवनी दिली आहे. जातीयतेच्या व द्वेषाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला गणी सय्यद यांचे हे कृतीमूलक उदाहरण चांगली शिकवण देणारे ठरते. गणी सय्यद यांची विठ्ठलभक्ती म्हणजे आजच्या समाजासाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे, जो सांगतो की,”भक्तीला धर्माची गरज नाही, फक्त प्रेम आणि समर्पणाची असते.”