Home Political माळेगाव साखर कारखाना निवडणूक : ‘ब वर्ग’मधून अजित पवारांचा दणदणीत विजय…

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : ‘ब वर्ग’मधून अजित पवारांचा दणदणीत विजय…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

बारामती :– बारामतीच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात प्रभावी स्थान असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीतील पहिला निकाल आज जाहीर झाला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

        ‘ब वर्ग सभासद प्रतिनिधी’ या गटातून अजित पवारांना १०१ पैकी ९१ मते मिळाली असून त्यांनी केवळ १० मते मिळवणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकाने पराभव केला. ही मते ‘ब वर्ग’मधील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली आहेत. एकूण १०२ मतांपैकी केवळ एक मत अवैध ठरले.

      हा निकाल निवडणुकीच्या प्रारंभातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलला मोठा बळकटीचा आधार मिळाला आहे. त्यांच्या या प्रभावी विजयामुळे आगामी मतमोजणीच्या टप्प्यांमध्येही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

      या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे पॅनेल आणि शेतकरी संघटना हे चार प्रमुख गट रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ साखर कारखान्यापुरती मर्यादित न राहता, बारामतीमधील राजकीय ताकद अजमावण्याची चाचणी ठरली आहे.

       राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आता पुढील टप्प्यातील मतमोजणीकडे लागले असून, अजित पवार यांचा हा प्रारंभिक विजय त्यांच्या गटासाठी नवा आत्मविश्वास घेऊन आला आहे.