शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
भाजपा अभियंता सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष इंजिनियर जगदीश लवाडिया यांनी भद्रावती व वरोरा शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी वाहतूक सिग्नल बसविण्याबाबतचे निवेदन आमदार करण देवतळे यांच्याकडे सादर केले आहे.
भद्रावतीतील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार चौक,बस स्थानक चौक,तसेच वरोरामधील आनंदवन चौक व रत्नमाला चौक येथे दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीचा गोंधळ निर्माण होत आहे.या चौकांमध्ये जड वाहने मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे.
इंजि.लवाडिया यांनी निदर्शनास आणून दिले की, दिनांक २८/०३/२०२४ रोजी भद्रावतीतील बाळासाहेब ठाकरे चौकात घडलेल्या भीषण अपघातात एक नागरिकाचा मृत्यू झाला,आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तत्काळ सिग्नल यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे…
1. संबंधित चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बसविण्यात यावेत.
2. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करावी.
3. जागोजागी सावधानता फलक व साइनबोर्ड लावावेत.
हा प्रस्ताव मान्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



