समता समानता समरसता हे शब्द असले तरी केवळ शब्द नसून या संकल्पना विचार तत्व पण आहेत.वरकरणी हे शब्द सारखेच वाटत असले तरी अर्थ आणि भावार्थ सारखे नाहीत.या तिन्ही संकल्पना मागचा भाव निराळा आहे.म्हणून एकाच अर्थाचे तीन शब्द नव्हेत,तरी एकच अर्थाचे काही शब्द असले तरी,ज्या अर्थी या शब्दांची निर्मिती का करावी लागली ? त्याचे कारण संदर्भ.
संदर्भानुसार यातील तीन शब्दांपैकी कोणता वापरायचा ते ठरवावे लागते.कोणताही शब्द कोणत्याही संदर्भास लागू पडत नाही ,किंवा वापरता येत नाही.कारण तसे झाले तर अर्थ बदलतो.अनर्थ पण होऊ शकतो.उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास ” पंढरपूरची वारी “. हा संदर्भ असेल तर यासाठी ” समरसता ” हाच शब्द वापरावा लागतो.कारण या वारीच्या मागची संकल्पना आणि भावार्थ हा ” समरसता ” आहे.इथे समानता हा शब्द वापरता येत नाही,कारण या वारीत समानता नसते,तो उद्देश पण नसतो.कारण समानता ही संकल्पना दोन घटकांच्या ” संधी आणि दर्जा ” यासाठीच वापरला जातो.वारीत संधी आणि दर्जा हा भाव नसतो,तर सारेकाही विसरून एकत्र येणे,एकमेकांबद्दल आदर प्रेम व्यक्त करणे हा भाव असतो,आणि देवाबद्दलची भक्ती असते.समानता यात भक्तिभाव नसतो.समरसते त पण भक्तिभाव नसतो,भक्ती फक्त देवासाठीच असते,माणसासाठी नसते.माणसाबद्द प्रेम आणि आदर असतो.कारण भक्तीचा भाव फक्त देवासाठी असतो,व्यक्तीसाठी नाही.म्हणून वारी हा संदर्भ येतो तेंव्हा तिथे समता किंवा समानता हे शब्द न जोडता समरसता हा शब्द जोडला जातो.भावभक्ती हा धार्मिक संदर्भासाठी वापरण्याची प्रथा आहे.
राजकीय संदर्भ येतो तेंव्हा म्हणजे राजकीय समरसता म्हंटले की,अलग अलग विचाराचे ,जातीचे,धर्माचे , पक्षाचे , लोक आपले अलगपणाचे अस्तित्व तसेच ठेऊन एकत्र येणे म्हणजे ” राजकीय समरसता ” होय.उदा.” चिखलातील कमल”. चिखलात जरी असला तरी चिखल अंगाला लागू देत नाही.ही एक प्रकारची समरसताच होय.
सामाजिक समरसता म्हणजे सर्व जातीचे लोक एकत्र येणे.आणि सामाजिक समानता म्हणजे साऱ्यांनाच समान संधी आणि समान दर्जा देणे होय.आणि सामाजिक समता म्हणजे वर्ण जाती स्वतःचे अस्तित्व,भाव,संधी,दर्जा सारे काही विसरून त्याग करून एकत्र येणे म्हणजेच एकमेकात मिसळून जाणे,एकजीव होणे होय.आर्थिक क्षेत्राचा संदर्भ घेतला तर गरीब मध्यम श्रीमंत असे जे वर्ग आहेत,ते तसेच ठेऊन तिन्ही वर्ग एकत्र राहणे म्हणजे समरसता होय.आर्थिक संदर्भाला समानता हा विषय चिटकवने म्हणजे ,वर्ग तसेच ठेऊन त्यांना प्रगतीसाठी समान संधी आणि समान दर्जा देणे,म्हणजेच तिन्ही वर्गाना आर्थिक क्षेत्रात अलग अलग ठेऊन दर्जाची आणि संधीची समानता होय.परंतु हे तिन्ही वर्गाचे अस्तित्व नष्ट करून एकच वर्ग ठेवणे,म्हणजेच गरीब आणि श्रीमंत वर्ग संपुष्टात आणून फक्त साऱ्या जनतेचे जीवन हे मध्यमवर्गीय करणे,याला आर्थिक समता म्हणतात.
तात्पर्य हे की,विषमता कायमची संपविली आणि प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक या सर्वच क्षेत्रात समता प्रस्थापित केली तर समरसता आणि समानता या संकल्पनांचे अस्तित्वच नष्ट होईल.समुद्राला नद्या मिळतात तेंव्हा ते स्वतःचे अस्तिव नष्ट करून समुद्रात विलीन होतात.एकजीव होतात.याचा अर्थ वर्ग ,जाती ,धर्म हे घटक स्वतःचे अस्तित्व संपवून ,म्हणजेच स्वतःचे वैशिष्ट्य,स्वतःचे गुण , स्वतःचे वेगळेपण विसरून जेंव्हा मानवतेच्या विशाल सागरात विलीन होतील तेंव्हाच ” समता ” ही संकल्पना अस्तित्वात येईल.आणि त्यावेळी समरसता ,समानता या संकल्पनांची माणसाला गरजच नसेल.मानवतेच्या जीवनात समता समतेचे साम्राज्य असेल,तेंव्हा माणसाला समरसतेचे आणि समानतेचे स्वप्न सुद्धा पडणार नाही.
जिथे विषमता आहे,तिथेच समरसता आणि समानतेचे प्रयोग करावे लागतात,जे निष्फळ ठरतात.
वर्ग जाती वर्ण धर्म न विसरता म्हणजेच विषमतेचा भाव असेल तिथे प्रेम, आदर, बंधुभाव,न्याय स्वातंत्र्य या मूल्यांचे स्वप्न पाहणे वेडेपणाचे ठरते.किंवा कपटीपणा च होय.



