Home देशविदेश धर्मांतर की धर्मत्याग…

धर्मांतर की धर्मत्याग…

      “धर्म” या विषयाचे चिंतन महान विचारवंत बाबासाहेब आंबेडकर आणि कार्लमार्क्स या दोघांनी केले आहे.धर्म ही संकल्पना मानवी जीवनाला वरदान आहे,कारण नैतिकतेसाठी धर्माची आवश्यकता आहे,परंतु ज्या ज्या धर्मात स्वातंत्र्य समानता बंधुभाव नाही तो धर्म मला मान्य नाही,असे बाबासाहेबांचे विचार आहेत,म्हणून विषमतेवर आधारित हिंदुधर्माचा त्याग करून समतेवर आधारित बौद्ध धर्माचा ( धम्माचा ) स्वीकार केला.

     धर्म म्हणजे काय ? तर एक विशिष्ट संकल्पना की जिला चौकट म्हणजे मर्यादा म्हणजे नियम म्हणजेच स्वयंस्वीकृत कायदे आहेत नव्हे असतातच.ज्याला धार्मिक भाषेत नीतीनियम म्हणतात,तसेच धर्म म्हणजे जिथे देव किंवा अलौकिक किंवा अद्वितीय किंवा अजोड असे व्यक्तिमत्वाची पूजा आराधना केली जाते असा पंथ मार्ग किंवा आचरण.जिथे आराधना पूजापाठ,कर्मकांड,देऊळ, स्तुप , विहार, मज्जिद ,प्रार्थना स्थळ,असते ,जिथे धर्मगुरू असतात,उदा.मुल्ला मौलवी,महाराज,मठाधिपती,पुजारी,पुरोहित, पाद्री फादर,भिक्कू.जे आपले आराध्यदैवतची भक्तांनी आराधना पूजापाठ कसे करावे ? कर्मकांड ची पद्धत काय ? धर्मग्रंथांचा अर्थ काय ? धर्म आणि आराध्य म्हणजे काय ? त्याचे जवळ जायचे कसे? त्याच्यात समाविष्ट व्हायचे कसे? इत्यादी अधिकारवाणीने सांगणारे मध्यस्त व्यक्ती .या साऱ्या गोष्टीचे भक्तास मार्गदर्शन करीत असतात.धर्म म्हंटला की आपले आराध्य आणि भक्त यांच्यातील दुवा हा आलाच,असतोच.याचा अर्थ धर्मात आराध्य,नीतीनियम,मध्यस्त,कर्मकांड, या गोष्टीचे महत्व येते.या चार गोष्टीचा मिळून धर्म बनतो.

      कार्लमार्क्स हे सारे काहीच मानत नाही,याचा अर्थ देव,आराध्य,धर्म,पुरोहितशाही या सर्व कल्पना तो झुगारतो.हे सारे शोषणास पूरक आहेत,म्हणून शोषणाविरुद्ध बंड करायला तो सांगतो.आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक गुलामी जोपासणाऱ्या या संकल्पना आहेत,धर्म ही माणसाला नशा आणणारी गोष्ट आहे,धर्माची गोळी घेतली की तो आयुष्यभर नसेतच झिंगत असतो,त्याचा मेंदूवरचा ताबा सुटतो,त्यास देव , धर्मा शिवाय जगात इतर काही महत्वाचे आहे,असे वाटतच नाही,उपसपोटी पण देवासाठी धर्मासाठी आयुष्यभर झटत असतो,इतकेच नाही तर तो यासाठी मारायला पण तयार असतो,भाकरी पेक्षा,धर्म श्रेष्ठ आणि पवित्र वाटायला लागतो,या नसेत माणूस आपली आर्थिक राजकीय परिस्थिती का बिघडली ? याचा विचार करण्याचे भान पण त्या भक्ताकडे नसतो.या जगात 70 टक्के लोक धर्म आणि देव मानणारे भक्त आहेत.आणि फक्त 30 टक्केच नास्तिक आहेत.

       बाबासाहेब म्हणतात ” आस्तिक बना “. आणि कार्लमार्क्स म्हणतात ” नास्तिक व्हा ” आपले जीवन बेहत्तर चांगले सुखी करायचे असेल,शांती हवी असेल तर आस्तिक व्हावे की नास्तिक ? हा एक मोठा आणि गंभीर प्रश्न आपल्या पुढे आहे,या प्रश्नाकडे तत्व म्हणून पहावे की व्यवहार म्हणून ? हा खरा प्रस्न आहे.

    कार्लमार्क्स म्हणतो,नीतिमत्ता ही धर्मामुळे प्राप्त होत नाही,म्हणजेच धर्म हा नीतीनियम ठरवू शकत नाही.कारण नीतीनियम नीतिमत्ता नैतिकता ही भौगोलिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय,परिस्थिती ठरवीत असते,नैतिकता हा मानसिकतेचा विषय जरी असला तरी माणसाची मानसिकता ही त्याच्या भौतिक परिस्थितीनुसार बनते.म्हणून एखाद्या अलौकिक व्यक्तीने कितीही तत्व निर्माण केली,काहीही नीतीनियम बनविले तरी ते समाज पाळत नाही,पाळू शकत नाही,अर्थात उपदेशाच्या भडिमाराने माणसे तत्व नैतिकता पाळण्याची भक्त बनून कोशिस करतात, तरी व्यावहारिक पातळीवर तत्व नीतीनियम पाळता येत नाही,म्हणून अनेकजण गळ्यात तुळशीमाळा घालूनही काही दिवसाला ती काढून खुंटीला टांगतात,अनेक भक्त धर्माच्या नियमानुसार चालत नाहीत,सहावेळा नमाज पडूनही त्यांना व्यवहारात जे आवश्यक वाटते तेच करतात.पंचशीलाच्या झेंड्यास नमन करूनही पंचशीलाचे पालन करत नाहीत.समाजातील राजकारणी,जमीनदार,भांडवलदार,व्यापारी,कर्मचारी हे तर धार्मिक कार्यात पुढाकार घेतात,पण धर्माचे म्हणजेच तत्व नीतिमत्ता याचे पालन करीत नाहीत,शोषण,भ्रष्टाचार,अन्याय,बलात्कार,महागाई,बेकारी हे निर्माण करणारे देवभक्त,धर्माचे ठेकेदारच असतात,सामान्य जनता पण त्यांचे अनुकरण करताना दिसते.हे वास्तव असेल तर मग नीतीसाठी धर्म ” ही संकल्पना फेल च समजावी लागेल.

      जो पर्यंत आर्थिक सामाजिक राजकीय विषमता आहे,विषमतेची व्यवस्था आहे,तो पर्यंत धर्म ही संकल्पना केवळ कल्पनाच असणार आहे,ही व्यवहारिक गोष्ट नव्हे.व्यावहारिक तर नाहीच,उलट मानवी जीवनास,मानवाच्या प्रगतीतील अडसरच होय.हेच सत्य म्हणावे लागते.आजच्या आपल्या अनुभवाच्या आधारे चे हे सत्य होय.

    याचा अर्थ माणसाला नीतिमत्ता असावी की नसावी ? हा प्रश्न शिल्लक असतोच.याचे उत्तर असे की,नीतीनियम हे भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीतून तयार होत असतात.उदा.समुद्रकिनारी असणारे लोकांचे प्रमुख खाद्य हे मासेच असतात.म्हणून येथील ब्राम्हणही मासे खाऊन पूजा करतात.यास निती म्हणतात.आदिवासी जंगलातील प्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका भागवतात.त्यात त्यांना अनैतिक असे काहीच वाटत नाही.मुस्लिम चार बायका करतात,चुलत बहिणीशी विवाह करतात,त्यात त्यांना अनैतिक असे काहीच वाटत नाही.याचाच अर्थ निती नियम हे स्थळ,काळ,समाज,परिस्थिती,भूगोल यानुसार बनतात,हे वास्तव एकदा कळले तर देव धर्माच्या संकल्पना गळून पडतात.

       बाबासाहेब म्हणाले की,” ज्या धर्मात विषमता,भेदभाव,आहे,स्वातंत्र्य नाही,बंधुता नाही,असा धर्म मला मान्य नाही ” हे खरे जरी असले तरी ही ही विषमता का आहे ? तर शोषणा मुळे आहे,हे शोषण का आहे ? तर शोषणावर आधारित व्यवस्था आहे.म्हणून ही व्यवस्था अशीच ठेऊन समानता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय हे व्यापक नैतिक मूल्यांची अपेक्षा करणे हे अव्यवहार्य ठरते.शिवाय या विषमतावादी व्यवस्थेत देव आणि धर्म ही संकल्पना या व्यवस्थेला पूरक आणि मजबूत करणारी ठरते.

          म्हणून धर्मांतर याचा अर्थ एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारणे ,असे असले तरी शेवटी धर्म म्हणजे ज्याला चौकट आहे,नीतीनियमाचे ,कर्मकांडाचे, बंधन आहे,अशीच संकल्पना होय.मर्यादा सीमा जिथे असते,तिथे स्वातंत्र्य नसतेच.म्हणून धर्मांतर म्हणजे दुसरा धर्म स्वीकारणे असा अर्थ न लावता,धर्मांतर याचा अर्थ धर्माचे अंतर,म्हणजेच धर्मापासून दूर जाणे,अंतर पडणे असाच घेणे संयुक्तिक होईल.एकार्थाने बाबासाहेबांचे धर्मांतर हे असेच आहे,असे मला वाटते,कारण ” बौद्ध” हा धर्म नसून एक विचार आहे,एक परंपरेपासून हटके मार्ग आहे,या अर्थाने हा धर्म नव्हे,परंतु या विचारास मार्गास जेंव्हा बुद्धाला देव करून विहार म्हणजे देवळे बांधले जातात,ते प्रार्थना मंदिर बनते,तेथे भिक्कू हे धर्मगुरूमहणून असतात,एक प्रकारची विशिष्ट आचरण पद्धतीचे बंधन असते,तेंव्हा संस्कृती निर्माण होते,आणि संस्कृतीचे स्वातंत्र्य जिथे नसते,तिथे धर्म उदयाला येतो.

      म्हणून ” धर्मांतर की धर्मत्याग ” हा महत्वाचा विषय आहे,यावर चिंतन,शोध ,विवेचन,समीक्षण करण्याची आजची गरज आहे.

       लेखक : दत्ता तुमवाड..

         सत्यशोधक समाज नांदेड..

दिनांक : 16 मे 2025.फोन : 9420912209.